Thursday, 8 October 2015

लाच




शब्दांचीच देतो मी  राणी तुला लाच
एकदा तरी शांतपणे माझी कविता वाच

प्रत्येक शब्द तुला वाटेल तुझीच अदा
तू तुझीच  होशील तुझ्यावरच फिदा
विचार करत मनोमन शृंगाराने सजशील
गोड गोड हसता हसता हळूच थोडी लाजशील
ज्याला ‘आरसा’ म्हणतेस तोच हा ‘काच’
एकदा तरी शांतपणे माझी कविता वाच

तुच तुला सांगशील हे नाहीत केवळ शब्द
जवळ घेवून कवितेला त्यात होशील लुब्ध
तीच तीच ओळ वाचशील पुन्हा पुन्हा
इतकाच काय तो ठरेल कवितेचा गुन्हा
माझ्या हरेक कवितेचा  तूच करशील ‘सुतोवाच’
एकदा तरी शांतपणे माझी कविता वाच

हळू हळू मोर्चा तुझा माझ्याकडे वळेल
शब्दांतून थेट नजर माझ्याशीच  भिडेल
‘मी’ आसपास असल्याचा होईल तुला भास
मी अगदी तसाच पण वाटेन तुला खास
ज्याला मन शोधत होते  ‘तो’ म्हणशील ‘हाच’  
एकदा तरी शांतपणे माझी कविता वाच

-- विवेक 

( सुतोवाच – पूर्वसूचना  )


Thursday, 8 January 2015

----- शोधून द्या ना प्लीज -----


शोधण्यासाठी घ्या वाटेल तेवढी फीस
हरवलेली कविता शोधून द्या ना प्लीज 


वेलीसम बहरली, मंद मंद लहरली
मनामध्ये मात्र , जरा नाही ठहरली
क्षणभरच चमकली जणू काही वीज
हरवलेली कविता शोधून द्या ना प्लीज


रंग जिचा रंगीत, शब्द जिचा संगीत
ऎकणारा, वाचणारा आयुष्याच्या गुंगीत 
आईने जिला गुणगुणता, लेकरास यावी नीज 
हरवलेली कविता शोधून द्या ना प्लीज

मनापासून लिहिलेली, परमेश्वरास वाहिलेली
डोळे भरूण जणू, अंधानेही पाहिलेली
शब्दा शब्दांत जिच्या ‘विवेका’ च बीज
हरवलेली कविता शोधून द्या ना प्लीज 


------विवेक
(भंडारा दि. 28/11/2014 )

उठ मानवा....



उठ मानवा जागा हो
उठ मानवा जागा हो
दारिद्र्य शिवण्या इतरांचे
सुखाचा तू धागा हो

कापून घे अभिमानी पर
पद येउ दे जमिनीवर
स्वार्थाच्या चष्म्याविणा
नजर फिरु दे सर्वांवर

काळी माती घे हाती
कणाकणाला निरखून बघ
तुच गवसशील तुला नव्याने
तुझेच भासेल सारे जग

लाभेल त्यालाच खरी तृप्ती
तहान इतरांची जो भागवेल
नियम ‘विवेकी ‘ संसाराचा
पेराल तेच उगवेल


---- विवेक