Friday, 27 May 2016

टोल


तिचा एक बोल। बहु अनमोल
काळजात झोल । करीतसे


तिचे मंद स्मित । आनंदाची फित
दुःखाचा रोल । सरतसे


'विक्या' म्हणे आता। माझ्या या कविता
प्रेमाचा मी टोल । भरीतसे


- विवेक
१४.०५.१६

-----पुन्हा सांगतो-----

पुन्हा सांगतो घसरशील तू
सुगंध माझा पसरशील तू


शब्दांत उधळला गंध प्रीतीचा
अाता स्वतःला विसरशील तू


वाळवंटी जर अडकलोच मी
मेघ होवूनी बरसशील तू 


राख जाहलो, मी सरलो जरी
तरी माझ्यातून 'न' सरशील तू 


- विवेक
१५.०५.१६

Thursday, 5 May 2016

~~~ मी ~~~

क्षण आनंदी दिसता लगेच सोकून घेतो
प्रेम जाणता डोळे झाकून झोकून देतो


वीजेप्रमाणे सत्य मांडतो शब्दांमधुनी
वादळास तर शब्दांनीच मग रोकून देतो


मैत्री करूदे माझ्यासंगे नाग सर्पही
तोही अलगद दात विषारी फेकून देतो


मला फिराया नकोच वाटे रूपया पैसा
शब्दांनीच मी जग हे सारे व्यापून घेतो


जगी कुठेही माणूसकीचे होता दर्शन
जरा झुकुनी नकळत माथा टेकून देतो


-- विवेक
१३.०४.१६

Monday, 2 May 2016

-----जसं आहे तसं आहे-----

तुझं  माझं नातं
खर सांगू कसं आहे
जाऊ दे, सोड नं
जसं आहे तसं आहे

पूर्ण चंद्र सुंदर दिसतो
खरचं मला मान्य आहे
पण अपूर्ण चंद्रकोरीत
तितकेच नाविण्य आहे
..........................
पूर्ण चंद्र की चंद्रकोर
खर सांगू कसं आहे
जाऊ दे, सोड नं
जसं आहे तसं आहे


खोट्या खोट्या गमतीने
खरी मजा येत नाही
खरे अश्रू ढाळले तरी
दुःख वजा होत नाही
......................
खोटी गंमत, खरे अश्रू
खर सांगू कसं आहे
जाऊ दे, सोड नं
जसं आहे तसं आहे


छोट्या छोट्या प्याकेज ने
शेतक-याचं भागत नसते
दुष्काळ समूळ संपण्यासाठी
नियोजन हे लागत असते
..............................
छोटा प्याकेज, पूर्ण नियोजन
खर सांगू कसं आहे
जाऊ दे, सोड नं
जसं आहे तसं आहे


- विवेक
०२.०५.१६