Tuesday, 31 December 2013

~~मी ऑफिस मध्ये जातो~~


मी ऑफिस मध्ये जातो ,मी ऑफिस मध्ये जातो
परि जाता जाता दररोज, मी विविध सोंगे घेतो
मी ऑफिस मध्ये जातो ,मी ऑफिस मध्ये जातो || धृ ||


बसने जाता जाता ऑफिसला रोज सकाळी
कधी कंडक्टर जवळ बसण्याची येते पाळी
मग तिकीट फाडण्या कंडक्टर जातो मागे
तो परतून येण्यापूर्वीच पुढचा स्थानक लागे
तेव्हा चढण- उतरण करण्या प्रवाशांची
मी घंटा वाजवून कंडक्टर होऊनी जातो || १ ||


बाजूच्या सीटवर असं कुणी बसतात
ते बालपणीचे माझे शिक्षक असतात
ज्या अर्थी ते आहेत माझे गुरु
करतोस काय ? करतात विचारणी सुरु
मग हळूच शिरून शाळेच्या आठवणींत
मी लाडका असा विद्यार्थी होऊनी जातो || २ ||


बस-स्थानकावर्ती कधी ऐकू येतात हाका
बघताच वळून दिसती गावचे काका
मग पुढचं काय? विचारूच नका बाप्पा
होतात सुरु न संपणाऱ्याही गप्पा
रंगुनी गावच्या सुरेल अशा भाषेत
मी त्यांच्यासंगे गावठी होऊन जातो || ३ ||


-- शब्दप्रेमी

Thursday, 12 December 2013

IT ज्याचं नाव

संदर्भ व चाल : करून करून काळजी माझी ....(संदीप खरे/ सलिल कुळकर्णी )

जिथल्या माणसाला माणसांत, उरला नाही भाव
करतो काम अशा क्षेत्रात IT ज्याचं नाव

झोपून उठलो कि laptop  ब्यागेमध्ये भरतो
बायको असून घरी , जेवण कॅन्टीन मध्येच करतो
दिवसरात्र जुंपल्या असतात लोकांसोबत मिटिंग
वेळ काढून घ्यावा लागतो कधीतरी 'कटिंग'
घरी यायच्या वेळेचा,जिथे नसतो ठाव  
करतो काम अशा क्षेत्रात IT ज्याचं नाव

गावच्या लोक वाटे , पोरगा किती चांगला
शिक्षण होताच पूर्ण, मस्त नोकरीवर लागला
आई-बापा वाटे आपली सेवा होणार मस्त
त्यांना सोडून पोरगा घालतोय परदेशाची गस्त
घरच्यांच्या सेवेला , जिथे नाही वाव
करतो काम अशा क्षेत्रात IT ज्याचं नाव


--शब्दप्रेमी

Tuesday, 10 December 2013

जगण्यात मजा आहे


प्रेम सागरास जो देई माझ्या भरती
चंद्र पौर्णिमेचा 'तो' बघण्यात मजा आहे

शोभून दिसण्या केसांच्या थरथरत्या लाटात
कळी म्हणे फुलण्यात मजा आहे

सुगंध त्या कस्तुरीचा बहरण्यास
वारा म्हणे वाहण्यात मजा आहे

ओलाव्यात तिच्या चिंब भिजण्यास
वर्षासरींना बरसण्यात मजा आहे

चाल बघुनी तिची नागमोडी
रस्ता म्हणे वळण्यात मजा आहे

मोर नाचतो लीलया शब्दांत
म्हणून शब्दप्रेमिच्या जगण्यात मजा आहे


-- विवेक
(शब्दप्रेमी )

Friday, 6 December 2013

मोहक - नाजूक - लीन


दिसता ती लोचना , फुले स्मित ओठांवरी
चिंब भिजे मन, धबधब्यात नहाल्यापरी

नजराणा तिच्या नजरेचा, भिडला नजरेस जरी
नजर लागू नये म्हणून तीळ नजरेवरी

गोडी तिच्या मनाची, झळकते शब्दातुनी
कर्ण असून वाटे, ऐकतो मुखातुनी

जणू ग्रीष्मातली सकाळ , केस  तिचे मायाजाळ
वेणी घातल्यास मी जखमी, मोकळे सोडल्यास घायाळ

सुडौल बांधा तिच्या शरीराचा, मुद्रा तिची लाजरी
दागीण्यास येई शोभा, वस्त्र वाटे भर्जरी

अप्सराच ती, मोहक - नाजूक- लीन 
शब्द्प्रेमीही अधुरा , तिच्या प्रेमाविण

-- शब्द्प्रेमी

Tuesday, 3 December 2013

प्रेम घ्यावे मी करून....

जगायचे किती, म्हटलं बघाव मरून
एकडाव वाटे,प्रेम घ्यावे मी करून
 
ऑफिसात यावी अशी गोरी-गोरी परी
नजरेत जादू तिच्या , खळी गालावरी
कळू नये तिला , मी पाहता चोरून
एकडाव वाटे, प्रेम घ्यावे मी करून
 
अचानक व्हावी मग तिची माझी भेट
भेटीला असावे निमित्त प्रोजेक्ट
तिला येत 'बग ', द्यावे फिक्स मी करून
एकडाव वाटे, प्रेम घ्यावे मी करून
 
हळू-हळू वाढेल आमचा संवाद
जेवताना सोबत येईल वेगळाच स्वाद
बघूनच तिला , पोट जावे माझे भरून
एकडाव वाटे, प्रेम घ्यावे मी करून
 
मग एके दिवशी, दिवस तो यावा
घरी जाण्या आम्हा थोडा उशीरच व्हावा
गाडीवर माझ्या,बसावी मला ती धरून
एकडाव वाटे, प्रेम घ्यावे मी करून
 
मनातले माझ्या तिला सांगेन सारे
लाजवी ती , मला वाटावे बरे
चालावे आम्ही, हात हातात धरून
एकडाव वाटे, प्रेम घ्यावे मी करून
 
प्रेमात तिच्या मी भिजेन चिंब
माझ्यात दिसावे तिला तिचे प्रतिबिंब
सोबतीने तिच्या जावे आयष्य सरून
एकडाव वाटे, प्रेम घ्यावे मी करून
प्रेम घ्यावे मी करून....
प्रेम घ्यावे मी करून....

-- शब्दप्रेमी 

Monday, 2 December 2013

शेततळे...


 KPIT Cummins मध्ये कामाला असताना 'सामाजिक जाणिव' म्हणून केपीआयटीने पुण्यापासून २० किमी अंतरावर 'कुसगाव' येथे एका शेतकऱ्याच्या डोंगराळ शेतीवर श्रमदानातून शेततळे बांधायचे हाती घेतले.त्याकरिता दर शनिवारी ४५-५० कामगार श्रमदानाकरिता कंपनीच्या खर्चातून कुसगावी जायचे व ३-४ तास काम करायचे.

आमची टीम जेव्हा गेली, तेव्हा त्यांना रस्त्यात मी ऐकवलेली हि कविता.
बघू तुम्हाला कशी वाटते.....




शेतात नाही पाणी, कल्पनाच भकास आहे
खोदायाचे शेततळे, मुद्दा झकास आहे

KPIT  च्या कल्पनेला, दिली कामगारांनी दाद
कुसगावी श्रमदानाचे,  ठरले निर्विवाद

खोदणार असले तळे, होणार नाही Leak
करावयाचे काम हे , Without any click

ना द्यावयाचे कुणा Updates , ना भरावयाची excel
मनास येईल तेथे, फोडा जमिनीचे pixel

खोदून असले तळे , समाधान मनास मिळे
आणि म्हणे कामगारांमध्ये, बंध भावनांचे जुळे

म्हणुनी विवेक म्हणे, जागला सर्वांचा 'विवेक'
एकावरी न थांबता,  बनतील  तळे अनेक



--शब्दप्रेमी

Sunday, 1 December 2013

मी उमलायाचे धाडस करणार...

अंधकारमय जग हे सारे
प्रकाश त्याच्यात मी भरणार
बरेच गळती फुलण्याआधी
मी उमलायाचे धाडस करणार
 
टाकलात मला जरी पाषाणी
खोदेन त्यावर सुंदर लेणी
दबलोच जर मातीच्या खाली
फुलुनी निघतील हिरव्या वेली
यंत्र होऊनी बसलेत सारे
मानव होऊन मी जगणार
बरेच गळती फुलण्याआधी
मी उमलायाचे धाडस करणार

पुरे झाली हि लाचारी
जन्मावा शिवाजी माझ्याच दारी
कळूनही नासमज जे सारे
उघडेन त्यांसाठी मी द्वारे
अविवेकी जरी असतील लाखो
एक 'विवेक' हा पुरुनी उरणार
बरेच गळती फुलण्याआधी
मी उमलायाचे धाडस करणार

-- शब्दप्रेमी