Saturday, 20 September 2014

मन माझे

मन माझे माझ्यावरती रूसून फुगून बसले
मन माझे माझ्यावरती रूसून फुगून बसले 


म्हणने त्याचे माझ्या, म्हणे कृतीत उतरत नाही
लोकांची घेऊनी भीती, मी स्वप्नच चित्रत नाही
मनास पटले नाही, माझे हे भेकड वागणे
जगण्यासाठीच केवळ, मनास मारून जगणे
अंतर्गत रहिवाश्यास बाहेरचे ना दिसले
मन माझे माझ्यावरती रूसून फुगून बसले ॥1॥

मज आता ऐसे वाटे, मन काढून घ्यावे हाती
निरखूनी त्यास बघूदे, जगण्याच्या चाली-रीती 
भावनांच्या जालात, मन अलगद जाऊन फसते
स्वत:चे मन राखल्यास, इतरांचे हिरमुसते
मनासाठीच सारे, मनाने हे सोसले
मन माझे माझ्यावरती रूसून फुगून बसले ॥2॥

Friday, 20 June 2014

मस्त मस्त वाटींग




सरली ना राव पावसाची वेटींग
मस्त मस्त वाटींग,मस्त मस्त वाटींग ॥धृ॥

काळे-काळे ढग एंट्री जवा मारींग
मनाचा मोर नाच तवा करींग
मातीचा गंध हवेत दाटींग
मस्त मस्त वाटींग,मस्त मस्त वाटींग ॥1॥

कागदी  होड्या पाण्यात वाहींग
घराचे छत कुणी सुधारू पाहींग 
बळीराजा शेतीच्या कामात जुटींग
मस्त मस्त वाटींग,मस्त मस्त वाटींग ॥2॥


तरूणांच्या डोक्यात टिक-टिक वाजिंग
थेंबाच्या स्पर्शानं कलिका लाजिंग
प्रेमाच्या बीजाला अंकुर फुटींग
मस्त मस्त वाटींग,मस्त मस्त वाटींग ॥3॥


ऑफिस जरासं वाटतयं बोरिंग
सारेच सुट्टीची अपेक्षा करिंग
गरमागरम भजी आणि एक कटींग
मस्त मस्त वाटींग,मस्त मस्त वाटींग ॥4॥ 

-- शब्दप्रेमी


Friday, 13 June 2014

अचानक जर झाली आपली भेट



तुटून पडलेल्या गुलाबाविषयी विचार करतोय देठ
काय होईल? अचानक जर झाली आपली भेट 

बघताच तुला नेत्रांच्या पुढती

हृदय स्पंदनी येईल भरती
आठवणींचे  तोडूनी जाळे

मन नभावर घेईल फिरती
धन्यवाद देईन देवाला जरी झालाय थोड लेट
अचानक जर झाली आपली भेट

नयनात निळसर 
बघतच राहीन 

केसांत मोकळ्या हरपून जाईन
संगे चालून दोन पावले 

मीही तुजसम ठुमकून पाहीन
दोघांनी जरी नाही ठरविले, ठरेल अपुली डेट
अचानक जर झाली आपली भेट

मोक्याची या करीत प्रतीक्षा 

लपुनि  बसल्या मनात पंक्ती
नाते जोडण्या दिगंतरीचे 

हळूच येतील ओठांवरती
लिहता-
लिहता बोटे थकली, बोलणार मी थेट
अचानक जर झाली आपली भेट......Emoji


--
विवेक कापगते
     (
शब्दप्रेमी)

पुन्हा एकदा ......


नजरेसंगे नजर मिळू दे पुन्हा एकदा
प्रेमाची त्या नशा चढू दे पुन्हा एकदा

लखलखणारा चांद उगवता नभोमंडपी
 लुकलुकणारे तारे नडू दे पुन्हा एकदा

गालावरची हलेल बट अन सुटेल वारा
वाऱ्यावरती मना उडू दे पुन्हा एकदा

गोड गुलाबी ओठांनी त्या हळूच हसता
आकाशाला लाट भिडू दे पुन्हा एकदा

पैंजनीचा नाद उमटता कानी छुनछुन
अंतरातले सूर जुळू दे पुन्हा एकदा

आठवणींची होऊनी शाई रंगले कागद
शब्दा शब्दा दाद मिळू दे पुन्हा एकदा


-- शब्दप्रेमी
(विवेक कापगते)
12.06.2014

Wednesday, 7 May 2014

करते कोण?

एक प्रयत्न.. संदीप खरे ह्यांच्या "देते कोण" च्या विडंबनाचा..

संदीप खरे  यांची  'देते कोण?' हि  रचना मी  प्रार्थना किंवा परमेश्वराचे आभार म्हणून दररोज ऐकतो व गुणगुणतो. ऐकता ऐकता हळूहळू  आपण म्हणजेच 'मानव' या निसर्गाचे काय करतोय हा विचार नेहमीच डोक्यात असायचा. त्यातूनच मिळालेला हा हुंकार...  करते कोण.......

करते कोण.......


तरंगांच्या जाळामध्ये अडकली हवा
गडप होऊ पाहतोय पाखरांचा थवा
भावनांची माती अन मातीची या धूप
पालटले आहे साऱ्या निसर्गाचे रूप 

करते कोण.......करते कोण.......
 
कधी ढगफुटी कधी पावसाला सुट्टी
ग्रीष्मात धरणीची होत आहे भट्टी
सागरातला वादळ गातो कर्कश गाणी
लागू पाहतेय इथे रोज आणीबाणी 

करते कोण.......करते कोण.......

शस्त्र निर्मितीचा  सारा पालटला हेतू
'नाम' विसरून जणू वागतात ऋतू
गाडीतून प्रवासात दिसती  'घरे पळती'
गंगाजलानेही राई-रोगा मिळे बढती  

करते कोण.......करते कोण.......

रानातली हिरवळ  रोज रोज वजा
छताविण चिंतातूर  जंगलचा राजा
धृवावरील बर्फ वितळून पाणी
भविष्यातील काळोख स्पष्ट नभावाणी 

करते कोण.......करते कोण.......

-- शब्दप्रेमी
(मूळ कविता - 'देते कोण' - संदीप खरे )   

Thursday, 6 February 2014

बदल


पाप्यास मान सारा, पुण्यास कोंडमारा
परि सत्याचा हाती दोरा, धरणेच बदल आहे

भेदास जन्म देती, जाती अन जमाती
जाती बगैर नाती, जुळणेच बदल आहे

दृष्टीत हिरवी सृष्टी, करण्या गुलाब वृष्टी
शरीरास अपुल्या कष्टी, करणेच बदल आहे

स्वार्थाचा भरला डोह, पैशाचा उहा-पोह
प्रथम ‘स्व’ चा मोह, सरणेच बदल आहे

मिरविन बॅंड-बाज्याशी, मागे टाकुन दुज़्याशी
स्पर्धा स्वत: स्वत:शी, ठरणेच बदल आहे

आयुष्याचे गुज ऎका, कळले आहे विवेका
जगण्यासाठी बरे का, मरणेच बदल आहे


-- शब्दप्रेमी
(विवेक कापगते)
 9860399722

Thursday, 16 January 2014

दिवसभरात निदान एकदा तरी दिसत जा



मनाचा झालाय रुसवा, डोळ्यांची होतेय जळजळ
जीर्ण झालेत कर्ण, रक्ताची थांबलीय  सळसळ
निष्प्राण या देहावर , संजीवनीप्रमाणे  बरसत जा
दिवसभरात निदान एकदा तरी दिसत जा

पाहताच तुझी मूर्ती, उत्साहाची येते भरती
दिवसाची कामे माझी , वेळेच्या आधी सरती
गोड-गुलाबी थंडीत, उन्हाप्रमाणे लासत जा
दिवसभरात निदान एकदा तरी दिसत जा

कसलीच नसते चिंता, ना कामाची ना दामाची
श्वास रोखुनी बघतो, वाट तुझ्या प्रेमाची
झळा माझ्या नजरेच्या, जरा तुही सोसत जा
दिवसभरात निदान एकदा तरी दिसत जा

मोजू लागलोय चांदण्या, घेवून आकाश हाती 
ना दिसता तू, काळीज माती-माती
लीला दाखविण्या तुझ्या, डोळ्यापुढे बसत जा- 
दिवसभरात निदान एकदा तरी दिसत जा

-- शब्दप्रेमी

 

Thursday, 9 January 2014

रुपयापुढे माणुसकी हरली

कुठल्या दिशेला भरकटताहेत माणसाचे विचार
विरोध दर्शवून भ्रष्टाचारास स्वतःच करिती भ्रष्टाचार
धावताहेत अशा शर्यतीत,ज्यात नाही कुणाचेच हित
प्रेमाची भावना सर्वांनी मातीखाली पुरली
रुपयापुढे  माणुसकी हरली ,रुपयापुढे  माणुसकी हरली ||१||

पैसा झालाय मोठा, माणूस ठरतोय खोटा
जीवन जणू व्यवहार, मुल्य नफा-तोटा
सत्तेची चढलीया तंद्री, झाले सारेच आत्मकेंद्री
भावनांचा पडलाय दुष्काळ, मनातली हिरवळ विरली
रुपयापुढे  माणुसकी हरली,रुपयापुढे  माणुसकी हरली||२||

दाखवुनी दमदाटी, सुरा खुपसती पाठी
हे सगळ कशासाठी ? केवळ पैशासाठी
पैसा म्हणजे राजस्व, पैसा म्हणजे सर्वस्व
रुपयासाठी माणस आता स्वाभिमान गमावून बसली
रुपयापुढे  माणुसकी हरली,रुपयापुढे  माणुसकी हरली||३||

-- शब्दप्रेमी