Saturday, 30 November 2013

स्वप्नबंबाळ


गावात माझ्या झाडेच झाडे
निळ्या नद्या , हिरवी पहाडे
निसर्गास मानून देवता
गाती अभंग नि पोवाडे


स्वार्थास आम्ही दूर सारले
प्रेमाचे बीज मनात पुरले
कुटुंबाची होऊनी नांदी
ओठांवरी स्मितही स्फुरले


प्रत्येक माणूस झाला जागा
भ्रष्टाचारास ना उरली  जागा
कर्मा वरती ठेवुनी श्रद्धा
बोलती सारे 'प्रेमाने वागा'


शब्दाद्वारे हृदय माझे
खोलण्याचा मी प्रयास केला
डोकावून त्यात वदले सारे
म्हणे 'विवेक' स्वप्नबंबाळ  झाला  


----शब्दप्रेमी

Thursday, 28 November 2013

कठीण आहे ... कठीण आहे ...

 सरकारी नोकरीत आल्यानंतर पाहिलेली तिथली परिस्थिती, इतरांची माझ्याशी असलेली वागणूक  यावर माझे  विचार...............


दुष्काळ आता पाण्याचा पाहून बीजास वाटे
खडकाळ जमिनीत या  रुजणे कठीण आहे

अतिरेक अस्वच्छतेचा चौफ़ेर काडी-कचरा

थंड होऊनी जळणे अग्नीस कठीण आहे

वाटेत खाच-खळगे   आणिक सर्प विषारी

तोल सावरून आता चालणे कठीण आहे

समयाचं नाही भान नुसतीच दिरंगाई

T-२० खेळनाऱ्यास   कसोटी कठीण आहे 

परी बोचायाचे आहे  काट्यास आज साऱ्या

फुलणे गुलाबाचे रोखणे कठीण आहे


----शब्दप्रेमी

Wednesday, 27 November 2013

मिळून सारे आपली संस्कृती जपू...


पाश्च्यातीकरणाने नात्यात आपुल्या टाकला असा बॉम्ब
'पॉप्स' झाले 'बाबा' अन 'आई' झाली मॉम
शब्दांप्रमाणेच नात्यात्लीही मधुरता लागली सरू
बालक टाकून पाळणाघरात, पालक लागलेत फिरू
यामुळेच भविष्यात , नयन लागतील टिपू
म्हणून मिळून सारे, आपली संस्कृती जपू


घर झालीत मोठी मात्र कुटुंब झाली छोटी
आजोळच्या प्रेमापासून वंचित, नातवंड छोटी
धुसर होत चाललाय, वडीलधाऱ्याविषयीचा आदर
छोटेच होऊ बघताहेत, मोठ्यांचेही फादर
आप्तांना लागली सर्व, पैशामध्ये मापु
म्हणून मिळून सारे, आपली संस्कृती जपू


-- शब्दप्रेमी

शिक्षण घेऊन सुद्धा मी काय शिकलो ?


बलात्कार होतोय निसर्गाचा , दिसतेय जरी मला
एक झाड लावायची, हिम्मत नाही मला
उधळून लावतोय मी, पर्यावरणाचा साज
कचरा दूर सारण्याची, वाटतेय मला लाज
कधीचा फांदीवर लटकतोय,परी नाही पिकलो
शिक्षण घेऊन सुद्धा मी काय  शिकलो ?

दोन पावलं चालणे, मला नाही जमत
मर्यादित साधनसंपत्तीची, मला नाही किंमत
दाखवाया आपल्या, दिमागाचा नूर
सिगारेट ओढून सोडतोय हवेत, काळजाचा धूर
आनंद साजरा करण्या, दारू प्यायला लागलो
शिक्षण घेऊन सुद्धा मी काय  शिकलो ?

मनाचा झालो कच्चा, जपू शकत नाही नाती
न सांगताच खातो, जातीसाठी माती
जे मी बोलेन, ते मी करणार नाही
जिथं नाही माझं स्वार्थ, तिथं डोके घालणार नाही
कर्तव्याच्या रिंगणात कुठेच नाही टिकलो
शिक्षण घेऊन सुद्धा मी काय  शिकलो ?

माणसांसाठी आता मजजवळ , उरला नाही वेळ
चालू असतात आता, माशिनिबरोबर खेळ
भावनांचा पडला दुष्काळ, मनी विचारांचा गुंता
वर्तमानात जगन सोडून, करतोय भविष्याची चिंता
क्षणोक्षणी चुकलो, खऱ्या आनंदाला मुकलो
शिक्षण घेऊन सुद्धा मी काय  शिकलो ?


--शब्दप्रेमी

थोडी बंडखोरी...



 बघून मुर्खांची मुजोरी, पाहून बुद्धिवंतांची लाचारी
अवखळ मनास वाटे करावी थोडी बंडखोरी

इंग्रजीच्या शेतात बुद्धी लागली आहे पिकू
अज्ञानी माणसेही आता ज्ञान लागली विकू
शिक्षणाच्या क्षेत्रात पसरली , राजकीय घाण
मास्तर व्हाया पाहिजे , ज्ञानाऐवजी 'दान'
पदव्यांचे कागद रंगवूनही, संस्कारांची पाटी कोरी
म्हणून मनास वाटे करावी थोडी बंडखोरी....

शिक्षणाने आजच्या , स्वार्थी झाला रे माणूस
लोभापायी झाला माणसाचा रे कानुस
भाऊ- बहिण , काका-मामा , नाते झाले रद्द
अमाप पैसा कमविणे , हीच फक्त जिद्द
सरल्यासारखी वाटते आहे , 'कुटुंब' नावाची शिदोरी
म्हणून मनास वाटे करावी थोडी बंडखोरी....


करावे मीही काही, प्रत्येकाच्याच मनात हाय
पण प्रत्यक्ष करण्यासाठी, पुढे जात नाही पाय
विवेकाला वाटले जागवावा सर्वांचा 'विवेक'
मिळतील बंडखोर एक नाही अनेक
कृती कोणतीही, चर्चेवाचून अधुरी
म्हणून मनास वाटे करावी थोडी बंडखोरी....

-- शब्दप्रेमी