Wednesday, 22 February 2017

---- टिमटिमणार चांदणं ----

तसं तर
टिमटिमणार चांदणं
दररोजचं असते ऩभात
त्यांच्या चिरंतन सौंदर्यासह
पण कदाचित...
आपलंचं लक्ष नसते त्यांच्याकडे

मात्र कधीतरी
एखाद्या शांत निवांत रात्री
हळूच वळते आपली नजर
.... आभाळाकडे
अन् तो चांदण्यांचा गारवा
जणू स्पर्शून जातो... अंतरंगाला
विलक्षण असतो तो क्षण
शेजारी कुणी असलं तरं त्याला
किंवा स्वत:लाच सांगत असतो आपण
चांदण्यांचं लुकलुकणं

तसं तर
टिमटिमणार चांदणं
दररोजचं असते ऩभात...

कविताही असते का हो???
ह्या चांदण्यांप्रमाणे??

--- विवेक
      १६.०२.१७

----- रेसिपी -----


विचारांची कढई घेतली
परिस्थितीची शेगडी घेतली
वास्तवाचे विस्तव दिले
भावनांचे तेल ओतले


कांदा मिरची यांची
कापून केली जोडणी
तळतळ आवाज
करणारी फोडणी


तिखटाची लाली, हळदीचा रंग
एवढेच नव्हते पुरे
सुरा तालासाठी
मोवरी आणिक जिरे


अर्थपूर्ण बाजारातून
भाजी होती निवडली
चिरून चिरून अगदी
मग लयीमध्ये सोडली


मसाल्याची मात्रा जरी
झाली होती नीट
चवीपुरत टाकलं
खारट खारट मीठ


ओलावा म्हणून मगं
पाणी थोडं ओतलं
शांततेच झाकण अन्
हलकेच झाकून घेतलं


आत सगळं शिजत असते
मंद मंद ज्योतीवर
लक्ष देवून उतरवायचं
जळण्यापूर्वी मातीवर


नवी नवी रेसिपी
रोज अशीच मिळत असते
एखादीची चव मात्र
जीभेवरती घोळत असते


--  विवेक
    २२.०२.१७

Thursday, 16 February 2017

स्वीकार

न्यायास जाळणारे इतके हुशार होते
अन्याय सुद्धा त्यांचे नियमानुसार होते


बोटींग, रायडिंग परी मौजेचा विषय झाले
जलधिसमान ज्यांचे व्यापक विचार होते


हिंस्त्र श्वापदांवर नेहमीच वार चुकतो
पर्यटक म्हणूनी गेले त्यांची शिकार होते


उगा नव्हेच अमुची रंगली तुफान मैत्री
दु:खास यार माझे हसणे स्वीकार होते


-- विवेक
०८.०२.१७

मोठी ओळ

मोठी ओळ
खरचं तुला
इतकी
सतावते


अजूनही तू
केवळ माझ्या
दोन शब्दांत
मावते


-- विवेक
१०.०२.१७

त्यांचा अंदाज

ती ही तशीच आहे
तो ही तसाच आहे
अंदाज अजुनी त्यांचा
वेडापिसाच आहे

कुठलाही आव नाही
कुठला बनाव नाही
साधेपणा असा की
वेडा नशाच आहे
अंदाज अजुनी त्यांचा
वेडापिसाच आहे

--- विवेक
    ०८.०२.१७

श्वास

त्रासास त्रास आहे
झक्कास खास आहे

वाटेल तेव्हा सुट्टी
कॉलेजचा क्लास आहे

तो भेटणे... मनाला
सुखाचा घास आहे

काहीच घडले नव्हते
नुसताच भास आहे

जे ते करती कुचंबना
काठावर पास आहे

भांडण झाले कुणाशी
हातात ग्लास आहे

ती लाजली जराशी
जो तो खल्लास आहे

घंटेचा नाद अजुनी
आई नावास आहे

तुजला दिसे कविता
माझा तो श्वास आहे

--- विवेक
     १०.०२.१७

पटकन मोठी होशील का??

पटकन मोठी होशील का??
माझी मैत्रीण होशील का??


माझ्या मनीचा गोंधळ
कुणीच समजून घेत नाही
मी बोलतो , तू देते
तशी स्माईल देत नाही
माझं काही हरवलेलं
मला शोधून देशील का??
पटकन मोठी होशील का??
माझी मैत्रीण होशील का??


चांदण्यांशी तारकांशी
आपण मस्त गप्पा मारू
एकेक टप्पा शोधत शोधत
कठीण मार्ग सोप्पा करू
मला जिथं पोचायचयं
तिथं मला नेशील का??
पटकन मोठी होशील का??
माझी मैत्रीण होशील का??


ऐकवीन मी तुला
खूप काही वाचलेलं
कधीतरी कुठेतरी
मनामध्ये साचलेलं
तुझ्यावरची कविता
हसत हसत ऐकशील का??
पटकन मोठी होशील का??
माझी मैत्रीण होशील का??


--- विवेक
     ०९.०२.१७

Tuesday, 7 February 2017

आवाज

तिने शब्द माझा वाचला असावा 
म्हणून मघाशी तो नाचला असावा 

तिला ऐकुणी बघ मला फ्रेश वाटे 
तिने शब्दात चहा ओतला असावा 

सपासप कापले माणसांनी माणसांना 
पुतळ्याविषयी कुणी बोलला असावा 

निर्जन स्थळावर कशी इतकी गर्दी 
नवा दगड कुणी तिथे मांडला असावा 

मला काढले बघ वेड्यांत त्यांनी 
मी आतला आवाज ऐकला असावा 


-- विवेक 
    29.12.2016

खोटं स्वप्नं

आठवणींवरील धूळ
ती हलकेच पुसत होती
असेल जरी लांब
पण मला दिसत होती


कसा आहेस? कशी आहेस?
प्रश्नोत्तरांचा तास
सारे सारे जुनेच
पण वाटत होते ‘खास’


ढगांचा गडगडाट 
झालाच कधी भारी 
वीजेप्रमाणे चमकायचा
अधून मधून ‘सॉरी’


मनातलं काहीतरी
उगाचं सांगत बसतो
ती तिकडे हसत असेल
मी एकडे हसत असतो


खोटं असेल सगळं
तरी खरं वाटतयं
स्वप्न बघून सुद्धा
खूप बरं वाटतयं


--- विवेक
   (चार/चार/सोळा)

मला नाही करायचयं तिच्याशी लग्न

मला नाही पटतं तिचं पुस्तकी वागणं
मला नाही करायचयं तिच्याशी लग्न

फिरायला जायचं ठरलं घेवून टु व्हीलर
लायसन्स घेतलं खिशात वाटलं ऑल क्लिअर
तिचं मात्र वेगळचं, म्हणे हेल्मेट घालायचं
नियम नाही मोडायचं, सिग्नल सारे पाळायचं
प्रवास सुरु होण्यापुर्वीच, हिचं नागरिकशास्त्र विघ्नं   
मला नाही करायचयं तिच्याशी लग्न

मी म्हटलं फिरायला किल्ल्यावरती जावू
गोड गोड गप्पा करू, तिखटं काही खावू
किल्ल्यावरती तिला मात्र दिसली हिरकणी
कधी आठवे अमुक राजा कधी तमुक राणी
मी असताना देखील इतिहासात बघणं
मला नाही करायचयं तिच्याशी लग्न

नंतर आम्ही दोघे बागेत जावून बसलो
रोमॅटिक वातावरण बघून स्वत:शीच हसलो
तिला मात्र दिसत होता आसपासचा कचरा
प्लासटिक आणि कागद यांचा कधी होणार निचरा
मी बघतोय तिच्याकडे, तिचं पर्यावरण बघणं
मला नाही करायचयं तिच्याशी लग्न

संध्याकाळी घालवला थोडा समुद्रावर वेळ
मला वाटलं खावं, पाणीपुरी व भेळ
ती म्हटली हे हायजेनिक नसते
अस्वछपणा असतोच त्यात विटॅमिनही नसते
तीचं सुरु विज्ञान अन मी खाण्यात मग्न
मला नाही करायचयं तिच्याशी लग्न

परतीला तीच म्हटली बोअर झाला असशील
छोटासा का होईना बुक स्टोअर झाला असशील
माझं असचं असतं, असणं तसं दिसणं
समोरच्याला थोडा त्रास आणि थोडं हसणं
हळूहळू पटतं होतं मला तिचं जगणं
करू का रे मित्रा तिच्याशीश  लग्न????


--- विवेक कापगते
    01.02.2017

काय झाले ते कळेना?



निद्रिस्थांना कोठूनी कळले, कुणी आपणास लुटताहे मुके होऊनी बसले होते, त्यांना वाचा फुटताहे 
 जमीन सरकताहे पायाखालुन, वाट काही मिळेना सामान्य अशा जनतेला, काय झाले ते कळेना ?

चकमकणारी दावुनी आमिषे, एकदा हाती घ्यायची सत्ता  तिजोरी आपली भरताना , यांचा विसरुन जायचा पत्ता कुत्रं पीठ खायला तयार, आंधळं काही दळेना  सामान्य अशा जनतेला, काय झाले ते कळेना ?

सामान्य माणसाच्या हाती सत्ता जेव्हा मिळेल  यांना जडलाय विश्वास, निवडुंग ही फुलेल सुर्योदय हा कसा जाहला? उत्तर काही मिळेना सामान्य अशा जनतेला, काय झाले ते कळेना ?

---  ‘शब्दप्रेमी’

कॉम्पुटर मी कॉम्पुटर



नव्या युगाचे मी सरकार
सर्वांचा मी लाडका यार
सारे ऑफिस सारे घर
अवलंबून बघ माझ्यावर
......... कॉम्पुटर मी कॉम्पुटर

हरेक कामाचा मी गणपती
उंदीरमामा माझे सोबती
सा-या जगाचे चित्र दिसते
माझ्या छोट्या भिंतीवर
......... कॉम्पुटर मी कॉम्पुटर

मी लोकांचा खातो वेळ
लहान मुलांना माझं वेडं
तुम्हीच माझा करता वापर
अन आरोप माझ्या अंगावर
......... कॉम्पुटर मी कॉम्पुटर


माझ्या अंगी सारे धाम
कला,मनोरंजन आणि काम
वाटत असलो हार्ड जरी
सॉफ्ट करतो सर्वांचे ज्वर
......... कॉम्पुटर मी कॉम्पुटर


सुधारण्या माझा दर्जा हो
जरा वाचवण्या उर्जा हो
कृपया मजला बंद कराहो
माझा वापर झाल्यावर
......... कॉम्पुटर मी कॉम्पुटर
--- विवेक

गच्चीवरती भटकायला

चोरपावली हळूच जायचो
गच्चीवरती भटकायला
कुणीतरी बघ तिथेच यायची
केस मोकळे झटकायला


लख्ख चेहरा, झुकती मान
क्षणाक्षणाला ये तुफान
ओल्या ओल्या केसांमधुनी
कंगवा घसरायचा बेभान
हृदय माझे हळूच लागे
केसांवरती लटकायला
चोरपावली हळूच जायचो
गच्चीवरती भटकायला


हलते केस , उडते केस
वा-यावर धडधडते केस
एकमेका आलिंगूनी
वेणीमधुनी जुळते केस
साधाभोळा भुंगा मी
मकरंद हवा मज चटकायला
चोरपावली हळूच जायचो
गच्चीवरती भटकायला


चोरपावली हळूच जायचो
गच्चीवरती भटकायला
कुणीतरी बघ तिथेच यायची
केस मोकळे झटकायला


(सौंदर्यप्रिय)
-- विवेक
०७.०२.१७

---- जावू दे उडत ----


सगळे म्हणे दुःख
सुसाट आहे सुटले
त्रास देत सगळ्यांना
जीवावरती उठले



आधी त्यानी शोधली
माणसं वयोवृद्ध
करा म्हणे त्यांना
माझ्याशी युद्ध
वृद्धांनी त्याच्यापुढे
दोन्ही हात जोडले
आधीच आहे आमचे
कंबरडे मोडले



खुष होवून दु:ख
स्वताशीच हसले
मग त्याला एक
नवरा-बायको दिसले
मुल-बाळ, शिक्षण,लग्न
हाच त्यांचा गुंता
कपाळावरच्या आठ्याच
सांगत होत्या चिंता



मग दु:ख एका
तरुणाकडे वळले
त्याच्या हसण्यात सुद्धा
दु:खच होते दडले
अडला होता शोधत
नोकरी अन् छोकरी
अपेक्षांच्या ओझ्याखाली
झाला होता बकरी



गर्वाने फुगुन दु:ख
झाले आणखी हौशी
वाकुल्या दाखवत गेले
एका बाळापाशी
बाळं म्हटले दु:ख बिक्ख
मला नाही कळत
अन् जे मला नाही कळत ते
जावू दे उडत



--- विवेक
०२.०२.१७

---- दोन थेंब -----

जसं आपण छोट्या मुलांशी वागतो तसचं सर्वांशी वागलो तर... 


जसा मी वागतो तुझ्याशी
तसाच वागलो सर्वांशी जर
मला वाटते आनंदाने
चिंब होईल देेवाचे घर



एकच गोष्ट पुन्हा पुन्हा
कुणी विचारली असती, सांगितली असती
तरीही मी चिडलो नसतो
हो म्हणत... मान डोलवत
हलकेच दरवळलो असतो



मी बोललो त्याच्या उलटं
जर कुणी बोललं असतं
मी मस्त हसलो असतो
मला सगळं चाललं असतं



मी काढलेली रांगोळी
जर कुणी मोडली असती
खोटं खोटं रागावून
मी पुन्हा ती काढली असती



तुलाच मी शोधलं असतं
प्रत्येकात खोल खोल
गोडं मानून घेतले असते
कुणाचेही बोबडे बोल



लबाडपणा किंवा नखरे
यांचे वाईट वाटले नसते
कदाचित मी त्यालाही
खूप छान म्हटले असते



ऐषो आराम प्रसिद्धी
साफ साफ खोटेपणा
लहान होण्यातच खरा
दडला असतो मोठेपणा



जसा मी वागतो तुझ्याशी
तसाच वागलो सर्वांशी जर
मला वाटते आनंदाने
चिंब होईल देेवाचे घर



-- विवेक
३०.०१.२०१७

----- मन ओरिएंटेड ल्यांगवेज ( कविता) -----

आय टी क्षेत्रात काम करणा-या सर्व मित्रांसाठी 


आयुष्य जणू क्लास आहे
मन त्याचे ऑबजेक्ट आहे
कविता हा तसा
फार इटरेस्टींग प्रोजेक्ट आहे


 
प्रतिके, प्रतिमा, उदाहरणे
हे नावापुरते लेबल असतं
आपण आपला अर्थ शोधायचा
इतकं सगळ वेरीएबल असतं
मनातलं बोलण्याची
मेथड अगदी करेक्ट आहे
कविता हा तसा
फार इटरेस्टींग प्रोजेक्ट आहे



छोट्या छोट्या शब्दात
बरचं असते दडलेलं
अर्थाच होवून अॅब्सट्रॅक्शन
डेटा एनक्यापसुलेशन घडलेलं
प्रेमाला कॉल करण्याचा
हवाहवासा सबजेक्ट आहे
कविता हा तसा
फार इटरेस्टींग प्रोजेक्ट आहे



एखादी ओळ वाचून
आपली कविता लिहीता येते
अापल्याला हवं तस
सारं इन्हेरीट करता येते
कधी प्रायवेट, कधी पब्लिक
कधी प्रोटेक्टेड सिक्रेट आहे
कविता हा तसा
फार इटरेस्टींग प्रोजेक्ट आहे



रसिकाला हवा तसा
अर्थ निघत असतो
चाल वेगळी, लय वेगळी
पॉलीमॉरफिजम जगत असतो
मनसोक्त रन करा
आऊटपुट परफेक्ट आहे
कविता हा तसा
फार इटरेस्टींग प्रोजेक्ट आहे



-- विवेक (कोडिंगप्रिय)
२५.०१.१७

-----कॅशलेस-----


कशावरही बंदी नाही
सा-यांसाठी स्पेस आहे
त्यांच नात कसं
अगदी कॅशलेस आहे



नियमांची लिमिट नाही
अपेक्षांच्या रांगा नाही
विश्वासाचे फार्म भरून
मनामध्ये दंगा नाही
लपवाछपवी शक्यच नाही
आरसा ज्याचा बेस आहे
त्यांच नात कसं
अगदी कॅशलेस आहे



कुणावरही कर्ज नाही
दयेसाठी अर्ज नाही
चिल्लर ठोक सारं चालतं
काही काही वर्ज्य नाही
त्यांचेवरती रेड म्हणजे
इम्पॉसिबल केस आहे
त्यांच नात कसं
अगदी कॅशलेस आहे



--- विवेक
०९.०१.१७

सगळं कसं छानं वाटतं !!!!!

पहाटे पहाटे आकाशाला
मस्तपैकी स्माईल द्या
निसर्गाच्या कुशीतुन
जणू आनंदाची फाईल घ्या
मस्तपैकी गाणं गा..... आपल्याच नादात
सूर,ताल, आवाज..... पडू नका वादात
स्वत:शीच बोलताना
फुलासम फुलताना
वा-यासवे डोलताना
कसं राजासारखं सन्मान वाटतं
सगळं कसं छानं वाटतं !!!!!



आठवण कुणाची आली
तर मिटून घ्या हो डोळे
स्वप्नामध्ये मनसोक्त
भेटून घ्या ना थोडे
आनंदाची भरती आली... लाटेसारखं उसळायचं
किना-याला भिजवून पुन्हा, सागरात मिसळायचं
आठवणींत शिरताना
प्रेमात भिरभिरताना
झ-यासारखं झरताना
एवढं मोठं जगसुद्धा लहान वाटतं
सगळं कसं छान वाटतं !!!



कुणी तुम्हाला वेडा म्हणतोय
म्हणजे तुम्ही जगताहात
कुडकुडणा-या थंडीत जणू
तुम्ही धगधगताहात
कुणीतरी हाक देतोय..... हाकेला ओ द्या
निराशा आणि आळसाला,'आईचा घो' द्या
खोल खोल बुडताना
उंच उंच उडताना
तिला जरा छेडताना
जगणं अगदी बेभान वाटतं
सगळं कसं छानं वाटतं !!!!!
सगळं कसं छानं वाटतं !!!!!


--- विवेक कापगते, भंडारा
०७.०१.२०१७

---अहवाल----


मी ढगांना दुष्काळावर पत्र दिले
उत्तर म्हणूनी त्यांनी एक सूत्र दिले
"एक माणूस लावत होता एक झाडं"
असले छान हिरवे हिरवे चित्र दिले



मी जातीला नोटीस दिले निवृत्तीचे
तिने देखील दिले दाखले सत्वृत्तीचे
"स्वार्थासाठी मनात मला जखडून बसणे"
कागद सोडा, ज्वलन करा ह्या प्रवृत्तीचे



सूर्य आणि चंद्रासोबत मी घेतली मिटींग
ग्लोबल वार्मिंग वर चर्चा केली घेत कटींग
सूर्य म्हटला नो प्रॉब्लेम फक्त एकच अट
तेहत्तीस टक्के झाडे लावा तोवर मात्र वेटींग



मी देवाला गायब होण्या हात जोडले
देवानेपण लगेच म्हणने मान्यही केले
"प्रामाणिकतेने नेहमी अपुले काम करा रे"
ऐसे म्हणूनी निर्णय अपुल्यावर सोडले



-- विवेक
०७.०१.१७

बघ तू ......


मनातली गाठ भीतीची खोलून बघ तू
मनापासून मनातले चल बोलून बघ तू


कुठवर शोधत बसशील चपला ,सँडल
अनवाणी पायाने पण चालून बघ तू


हृदयातील गोदाम भरतील समृद्धीने
विश्वासाचे चार बियाने पेरून बघ तू


बघताक्षणीच गळून पडतील कैक फुले
बागेत जावूनी एकदाचे लाजून बघ तू


तुझ्यातले लहान मुल सापडेल कदाचित
खळखळून एकदा मित्रा हसून बघ तू 


नजरेने तू केल्या असतील लई शिकारी
शब्दांचे हे बाण एकदा झेलून बघ तू


--- विवेक कापगते, भंडारा
२१/१२/१६

------ *अशी वाटते* -------


खरं सांगू, कविता कशी वाटते
 तुझी भेट झाली अशी वाटते

किती छान बोलून जातोस तू 
मन टेकून घ्यावे अशी उशी वाटते

खोल खोल अगदी मनाच्या तळाशी 
नेणारी वाट लहानशी वाटते

जाऊ दे आता सांगत नाही 
जणू माझे स्वप्न मोरपिशी वाटते 

 -- विवेक कापगते,भंडारा
दोन/आठ/सोळा