Tuesday, 7 February 2017

---- दोन थेंब -----

जसं आपण छोट्या मुलांशी वागतो तसचं सर्वांशी वागलो तर... 


जसा मी वागतो तुझ्याशी
तसाच वागलो सर्वांशी जर
मला वाटते आनंदाने
चिंब होईल देेवाचे घर



एकच गोष्ट पुन्हा पुन्हा
कुणी विचारली असती, सांगितली असती
तरीही मी चिडलो नसतो
हो म्हणत... मान डोलवत
हलकेच दरवळलो असतो



मी बोललो त्याच्या उलटं
जर कुणी बोललं असतं
मी मस्त हसलो असतो
मला सगळं चाललं असतं



मी काढलेली रांगोळी
जर कुणी मोडली असती
खोटं खोटं रागावून
मी पुन्हा ती काढली असती



तुलाच मी शोधलं असतं
प्रत्येकात खोल खोल
गोडं मानून घेतले असते
कुणाचेही बोबडे बोल



लबाडपणा किंवा नखरे
यांचे वाईट वाटले नसते
कदाचित मी त्यालाही
खूप छान म्हटले असते



ऐषो आराम प्रसिद्धी
साफ साफ खोटेपणा
लहान होण्यातच खरा
दडला असतो मोठेपणा



जसा मी वागतो तुझ्याशी
तसाच वागलो सर्वांशी जर
मला वाटते आनंदाने
चिंब होईल देेवाचे घर



-- विवेक
३०.०१.२०१७

No comments:

Post a Comment