Thursday, 16 January 2014

दिवसभरात निदान एकदा तरी दिसत जा



मनाचा झालाय रुसवा, डोळ्यांची होतेय जळजळ
जीर्ण झालेत कर्ण, रक्ताची थांबलीय  सळसळ
निष्प्राण या देहावर , संजीवनीप्रमाणे  बरसत जा
दिवसभरात निदान एकदा तरी दिसत जा

पाहताच तुझी मूर्ती, उत्साहाची येते भरती
दिवसाची कामे माझी , वेळेच्या आधी सरती
गोड-गुलाबी थंडीत, उन्हाप्रमाणे लासत जा
दिवसभरात निदान एकदा तरी दिसत जा

कसलीच नसते चिंता, ना कामाची ना दामाची
श्वास रोखुनी बघतो, वाट तुझ्या प्रेमाची
झळा माझ्या नजरेच्या, जरा तुही सोसत जा
दिवसभरात निदान एकदा तरी दिसत जा

मोजू लागलोय चांदण्या, घेवून आकाश हाती 
ना दिसता तू, काळीज माती-माती
लीला दाखविण्या तुझ्या, डोळ्यापुढे बसत जा- 
दिवसभरात निदान एकदा तरी दिसत जा

-- शब्दप्रेमी

 

Thursday, 9 January 2014

रुपयापुढे माणुसकी हरली

कुठल्या दिशेला भरकटताहेत माणसाचे विचार
विरोध दर्शवून भ्रष्टाचारास स्वतःच करिती भ्रष्टाचार
धावताहेत अशा शर्यतीत,ज्यात नाही कुणाचेच हित
प्रेमाची भावना सर्वांनी मातीखाली पुरली
रुपयापुढे  माणुसकी हरली ,रुपयापुढे  माणुसकी हरली ||१||

पैसा झालाय मोठा, माणूस ठरतोय खोटा
जीवन जणू व्यवहार, मुल्य नफा-तोटा
सत्तेची चढलीया तंद्री, झाले सारेच आत्मकेंद्री
भावनांचा पडलाय दुष्काळ, मनातली हिरवळ विरली
रुपयापुढे  माणुसकी हरली,रुपयापुढे  माणुसकी हरली||२||

दाखवुनी दमदाटी, सुरा खुपसती पाठी
हे सगळ कशासाठी ? केवळ पैशासाठी
पैसा म्हणजे राजस्व, पैसा म्हणजे सर्वस्व
रुपयासाठी माणस आता स्वाभिमान गमावून बसली
रुपयापुढे  माणुसकी हरली,रुपयापुढे  माणुसकी हरली||३||

-- शब्दप्रेमी