Friday, 9 June 2017

--- सुगंध ---

सहजं म्हणून एका फुलाशी गप्पा मारल्या. त्याची नाजुकशी स्वप्ने कळाली. आणि हो फुलांच्या सुगंधाचे गुपित सुद्धा..

--- सुगंध ---

प्रतिक होवून प्रेमाचं
नसतचं आम्हाला सजायचं
झुळूकेच्या इशा-यावर
आम्हाला असतं लाजायचं

अर्पन व्हावसं वाटतं नाही
कुणाच्याही चरणांशी
मनसोक्त खेळू वाटतं
तेजोमय किरणांशी

घाम येतो अंगाला
सोसून पुस्तकांच्या पानांच लव्ह
सुगंधाने पाकळी भिजते
झेलून पहाटेचं दवं

खरं सांगतो मकरंदाला
बाटलीत नको विसावा
फिदा होवून आमच्यावर
भुंग्यांनी तो शोषावा

धाग्यामध्ये गुंफता तुम्ही
धागा आम्हा रूततो
फांदीवरचा काटा मात्र
मनास गुदगुदतो

आमचं झाडं आम्हाला
कधीच नसतं सोडायचं
पाकळी पाकळी होवून
सहज असते गळायचं

न खुडता आम्हाला
झाडास देतो पाणी
त्या माणसाचा सुगंध
आम्हा फुलांच्या मनी
त्या माणसाचा सुगंध
आम्हा फुलांच्या मनी

-- विवेक कापगते, भंडारा
०५.०५.१७

----कुठली शाळा निवडू राव???----


पिल्लू मोठं झालयं रावं
शाळेत घालू याचं नाव
शाळेसाठी ऑप्शन फार
स्टेट ,सीबीएसई मिडीयम चार
सगळीकडे धावाधाव
कुठली शाळा निवडू राव???
कुठली शाळा निवडू राव???

आधी गेलो कॉन्हवेंटात
सगळं काही फिट्टम फाट
पण एवढी भारी फीस
गरीबांचा काढते कीस
अजब वाटते आहे अजून
शिक्षण भेटतयं नोटा मोजून
कपडे लत्ते वापरून फीट
शिक्षण खरचं भेटतय नीट???
इंग्लिश येते नो डाऊट
मातृभाषा होते आऊट
डोकं फिरतय गरगर राव
कुठली शाळा निवडू राव???

निवडली जर सरकारी शाळा
लोक मला म्हणतील 'वेडा'
सरकार म्हणजे एवढेच होय
गैरसोय हो गैरसोय
शिस्त नाही लक्ष नाही
मास्तर कर्तव्य़दक्ष नाही
काळासोबत धावणे नाही
उपक्रम राबवणे नाही
पाहून ही सारी स्थिती
भविष्याची वाटते भीती
देवा तूच मार्ग दाव
कुठली शाळा निवडू राव???
-- विवेक

माझी आई

बाळा अशीच माझ्यामध्ये वसते माझी आई
अन् असेच माझ्या ओठून हसते माझी आई

जाणूनबुजून मी लाडाने प्रेमाचे जाळे विणतो
जाणूनबुजून माझ्या जाळात फसते माझी आई

आई म्हणजे न दिसणारे अवयव आहे का हो??
माझे अश्रू माझ्याआधी पुसते माझी आई

चांगल्या वाईट मजपाशी जमल्या ब-याच पदव्या
माझ्यासाठी युनिवरसिटी असते माझी आई

एके दिवशी माझ्या हाती चित्र सुखाचे आले
हुबेहुब सुखासारखी दिसते माझी आई

काळजाचे पीळ निघाले अथवा घुसमट झाली
तेव्हा माझ्या कवितेमधून ठसठसते माझी आई

-- विवेक
१०.०४.१७

---- बाकी काही नाही -----

थोडी थोडी आठवण येते, बाकी काही नाही
अश्रूंवरती दडपण येते, बाकी काही नाही


तुझ्या मोकळ्या केसांसंगे इकडे तिकडे डुलतो
बाकीच्यांना अडचण होते, बाकी काही नाही


कालच माझ्या ओठांवर ती ओठ टेकवून गेली
साधे बक्षीस वितरण होते, बाकी काही नाही


वादळ सुटले,विजा चमकल्या,धरती ओली झाली
दोन जीवांचे घर्षण होते , बाकी काही नाही


तेज बिलंदर, मस्त कलंदर राजा राणी बसले
अमुच्या पुढ्यात दर्पण होते , बाकी काही नाही


वेणीवरती लटकून होते जरा कुठे ना हलले
फुल जरासे सज्जन होते, बाकी काही नाही


तिच्या नकळत तिच्या उशाशी ठेवून येतो गजरा
अाधी अमुचे भांडण होते, बाकी काही नाही


वेडे खुळे जग हे त्याला 'माझी कविता' म्हणते
तुझ्या स्मृतींचे चित्रण होते , बाकी काही नाही

-- विवेक
२१.०३.१७

#---- *चिवचिवाट* ----#

जागतिक चिमणी दिवसाचे निमित्त्ताने 

#---- *चिवचिवाट* ----#

झाडावरती भरला होता चिमण्यांचा क्लास
चिवचिव चिवचिव सूर मंजुळ आणि खास
छोटी चिमणी बोलली सावरत आपली बट
दिवसेंदिवस होतेय आपल्या संख्येमध्ये घट
रचतोय का कुणी आपल्याला मारण्याचा कट
काय असणार गुरूजी आपल्या भविष्याचा पट?

ऐकून छोट्या चिऊचे प्रश्न साधे भोळे
किंचितसे पाणावले चिमण्या गुरूचे डोळे
डोळे पुसत गुरजी म्हटले 'हा वातावरणातील चेंज'
मनुष्य प्राणी विणतोय जाळी मोबाईलची रेंज
त्याचपायी होतोय आपणा श्वास घेण्या त्रास
हॅलो हॅलो त्यांच जुळतं, सुटतो आपला श्वास
दिवसेंदिवस कोंडत जाणार नभात आपले श्वास
चिवचिव म्हणजे केवळ उरेल एक भास
मला वाटतं मनुष्यचं आपला वंशज ठरणार
काऊ चिऊच्या गोष्टीतून तोच चिवचिव करणार
..........तोच चिवचिव करणार
-- विवेक
२०.०३.१७

नारी

#HappyWomensDay

( तांदळाच म्हणजेच धानाच पीक हे 'स्त्री' जीवनाच प्रतिक मानलं जाते, त्यावरून सुचलेलं काही...)

एका मातीच्या ओलात
होते लाडाने पेरणी
आभाळाला झुकवित
सुखी नांदते धरणी

एके दिवशी श्रावणी
येते अशी बोलावणी
माती सोडूनी जुनी
नव्या चिखली रोवणी

जुन्या मातीचीच माया
पाझरते मेघातूनी
नवी नाळ जुळतेया
फुलणा-या दाण्यातूनी

होतो धरणीचा रंग
चकाकता सोन्यावाणी
सूर सुखाचे जुळती
पाखरांच्या गाण्यातुनी

कशी मुलाम मुलाम
मऊ मऊ भातावाणी
नारी तुला गं सलाम
या 'विवेकी' मनातुनी

--- विवेक कापगते, भंडारा
०८.०३.२०१७

--- अस्तित्वाचा प्रवास ----

जसा तो जन्माला आला
काळा, गोरा 'रंग' भेटले
आईसारखा, बाबासारखा
असले दिव्य अंग भेटले

नंतर तो शाळेत गेला
तिथे त्याला 'मार्क' भेटले
ढ, हुशार , सर्वसाधारण
असले काही वर्ग भेटले

तिथून तो ऑफिसात गेला
तिथे त्याला 'इन्क्रीमेन्ट' भेटले
क्रेडीट, डेबिट, लोन वगैरे
असले काही स्टेटमेंट भेटले

मग तो समाजात चालला
पावलोपावली 'जज' भेटले
नुसतं भविष्य बघणारे
तेच ते पूर्वज भेटले

वाट चुकून देवळात गेला
तिथे त्याला गर्दी भेटली
कुठ् भगवी कुठे हरीत
रंगबेरंगी वर्दी भेटली

शेवटी तो घरी गेला
तिथे त्याला 'पार्टेशन' भेटले
हे माझे , ते तुझे
असले काही कोटेशन भेटले

एक दिवस तो मेला
अन् त्याचे अंग पेटले
खूप छान माणूस होता
सारे असेच पुटपुटले

--- विवेक कापगते
भंडारा.

अजून कुठे

ज्ञान आता अगदी स्वस्त झाले आहे
रेड्यांना म्हणे वेद कंठस्थ झाले आहे
पुढला जन्म ठेवलाय कृतीसाठी राखीव
हे जन्म तर प्रचारात व्यस्त झाले आहे
त्यांचे मन खरचं घेवू शकेल उंच भरारी??
जे मुक्तीच्या साच्यात बंदिस्त झाले आहे
नेत्यास भ्रष्ट म्हणने मज अर्धसत्य वाटे
मतदारांचे इमानही उध्वस्त झाले आहे
दुस-या पोळ्यातून ती मध चोरत नाही
कष्टाचे जीवन किती मस्त झाले आहे
मी आणखी दु:खाला किती छळू देवा
दु:ख माझे जिवलग दोस्त झाले आहे
किती व्यूह रचणार निर्लज्ज जयद्रथांनो
अजून कुठे विवेकाचे अस्त झाले आहे??

-- विवेक कापगते, भंडारा
०३.०३.२०१७

माझं बाळ ! माझं बाळ

महाभारतातील कर्णाच्या जन्माची कहाणी तशी सर्वश्रूतच आहे. दुर्वास ऋषींच्या आशिर्वादाने कुंतीला ‘देवहूती’ मंत्राचे वरदान मिळाले. त्यानुसार ती विश्वातील ज्या शक्तीचे स्मरण करेल ती शक्ती पुत्र रुपाने तिला जन्मास येणार होती. कुमारी अवस्थेत असतानाच कुंतीने सूर्यदेवाचे स्मरण करूण मंत्रोच्चार केला व तिला कर्णाच्या रुपाने तेजस्वी पुत्र जन्माला आला. मात्र ‘क्षत्रिय कन्येस शील महत्वाचे असते व प्रसंगी तिने शीलासाठी प्राण देखील त्यागावा’ असे पितृवचन तिने आधीच ऐकले होते. त्यामुळे विचारांच्या द्वंद्वात स्त्रीचे आभूषण ठरणारे मातृत्व समाजातील व्यवस्थेच्या शीलापुढे झुकले व तिने त्या बाळाला (कर्णाला) अश्वनदीत लोटून दिले.
हा प्रसंग शब्दबद्ध करण्याचा मी प्रयत्न केला आहे. असे प्रासंगिक वर्णन करताना गण , मात्रा , इत्यादींची दखल घ्यायला हवी याची मला जाणिव आहे. तथापी या बाबींचा माझा तितकासा अभ्यास नसल्यामुळे मी मला वाटेल त्या पद्धतीने (मुक्तपणे) आपल्या तुटक्या शब्दात हा प्रसंग रेखाटण्याचा पयत्न केला आहे.

काही शब्दांचे अर्थ –
( अरि – शत्रू , धात्री- कुंतीच्या दासीचे नाव , चपला- वीज़ , दिनकर - सूर्य)


दुर्वासाची कठोर वाणी ’
देवहूती’ मंत्राची देणी
ज्या-ज्या शक्ती येती स्मरणी
होशील त्या वीरांची जननी

वसंतातले एके दिवशी
तेजस्वी कणांचे स्पर्शी
मंत्र उमटले ओठांपाशी
‘ओम हिरण्यमेय पात्रेन...’-सूर्यदेवाशी

नेत्रापुढे तेजाची कांता
प्रकाशाची ओढ अनंता
‘धात्री’ने हेरली चिंता
कुंती, तुम्ही होणार माता

मातृत्व हे स्त्री आभूषण
मुक्तीचे ते ठरते दालन
स्त्री जन्माचे सार्थकसे क्षण
माझ्यासाठी पाप कसे पण???

आर्यस्त्रीचा स्वाच्छोवास
वीरकन्ये शीलाचा ध्यास
क्षत्रिय स्त्रीचा असे प्रवास
शीलासाठी सोडावे श्वास

कौमार्यावस्थेत मातेची खंत
करु वाटे दुख:चा अंत
विष प्राशावे नसानसांत
प्रायश्चित्त हेचि अनंत

असर करु न शकला अरि
विषाने न ती मरणारी
दिनकरासम तापणारी
कोण असे मी नारी ???

शरदाचं ते गोडं चांदणं
नभी चपलेचं चमचमणं
यातनांचं असह्य होणं
चिमण्या जीवाचं ओरडणं

रुपडं उगवत्या रवीपरी
मांसल कुंडल कर्णावरी
कवच सोनेरी देहावरी
रोमांच उभे अंगावरी

‘कुलटा कलंकिनी’ बोचतील स्वर
त्यागाशिवाय ना गत्यंतर
वास्तव भारी त्या ममतेवर
पाप पुण्य अबलेचे घरघर

अश्वनदीला अर्पून बाळ
मृत्यूंजय ठरला तो काळ
स्वरांनी दुमदुमले आभाळ
माझं बाळ ! माझं बाळ

 विवेक कापगते , मोहाडी
 दि. 01/03/2016
('मृत्यूंजय' वाचता वाचता...)

बस बाकी काही नाही ....

अरबो खरबो माणसांमधल्या
कुण्या एकाच्या मेंदूमधल्या
अगणित न्यूरॉनमधल्या
कोणत्यातरी धाग्यातून निघालेल्या
कुठल्यातरी हातांनी टाईपलेल्या
कुठल्यातरी स्क्रीनवर उमटलेल्या
कोणत्यातरी भाषेत लिहलेले शब्द
तिथून उडी घेवून
कसेतरी एन्क्रीप्ट होवून
कुठल्यातरी नेटवर्कमधून
वा-यासंगे वादळून
वेगवेगळ्या टॉवर्सला आदळून
कसाबसा मार्ग शोधून
कितीतरी नंबरमधून
एक नंबर निवडून
स्वत:ला गच्च आवळून
कुणालाच न दिसता
कुणाच्यातरी मोबाईलच्या स्क्रीनवर धडकले
"फक्त तुझी आठवण आली"
बस बाकी काही नाही ....


-- विवेक
३०.०१.१७
( कवी 'निशब्द देव' यांच्या 'बस बाकी काही नाही' अशा आशयाच्या कविता वाचून सुचलेलं)

--- दुमडलेलं पानं ---

पुस्तक वाचता वाचता
स्पर्शून जातात काही शब्द
....... मनाच्या गाभा-याला
जीवनाची क्षणभंगुरता विसरून
धुंदीच्या आभाळात उडाण घेणारेे
पंख असतात त्या शब्दांना....
सुगंधाने लडबडलेली असतात ती शब्दफुले
दरवळतात आपल्या तनामनात
तेव्हा आपणही आठवन म्हणून
दुमडून ठेवतो ना ते पान...
जेणे करूण तितक्याच सहजपणाने
अनुभवता यावा तो सुगंध पुन्हा पुन्हा
कुठल्यातरी वळणावर
पुन्हा चाळवलं गेलं ते पुस्तक
तर....
या दुमडलेल्या स्मृतींनी
छेडली जाते
अंतरंगातील कोमल तार
काळजाच्या ओलसर वाळूवर
उमटलेलं पावलांच अर्घ्यदान
पुस्तकात कधीतरी सापडतेच
दुमडलेलं एखादं पानं
पुस्तक वाचता वाचता....


-- विवेक
२५.०२.२०१७