Friday, 29 April 2016

हे असे कसे??

शब्द नकोसा तिला वाटतो मी असताना
तोच शब्द मग ती गुणगुणते मी नसताना
हे असे कसे??

माझ्यावरती रूसते फुगते माझी बाहुली
उन्हात जाता सोबत असते तिची सावली
हे असे कसे??

कवितेसाठी हवा म्हणालो रसिक दर्दी
डोळे उघडले.. तिचीच गर्दी,तिचीच गर्दी
हे असे कसे??

थकले होते.. वेळे अगोदर झोप लागली
स्वप्नामध्ये तिच्याचसंगे मी रात्र जागली
हे असे कसे??

हृदय खोलता गंमत करूणी वाट लाविते
जख्मी होता हात धरूणी वाट दाविते
हे असे कसे??

"तू वाहत्या पाण्यासारखा" वाक्य तिचे असे
वाहणा-या पाण्यावर तिच्या पावलांचे ठसे
हे असे कसे??


- विवेक
29.04.2016

Thursday, 28 April 2016

----- भेटला तर सांगा -----

छोटा छोटा कोड
भाषा ज्याची गोड
जो सोसू शकेल
भावनांच लोड
आऊटपुट ज्याचं
आनंदाच्या रांगा
असा काही प्रोग़्रॅम
भेटला तर सांगा

प्रोग्रॅम लिहला असावा
वापरूण भाषा मनाची
‘रन’ होण्या ज्याला
मदत नको कुणाची
‘डिलिट’ करू शकेल
जो मनातला दंगा
असा काही प्रोग़्रॅम
भेटला तर सांगा

मन होवून स्वच्छ
दिसेल आर पार
संशयाचा ‘व्हायरस’
घुसण्याआधीच ठार
एरर नं 420
सोबत ज्याचा पंगा  
असा काही प्रोग़्रॅम
भेटला तर सांगा 

-- विवेक 
28.04.2016

Wednesday, 27 April 2016

नावडती कविता

पटणार नाही तुम्हाला
कल्पना जरा नवी आहे
कुणालाही आवडू नये
अशी कविता हवी आहे


शब्द शब्द जिचा
जांभई घेवून यावा
अगदी वाटाव जसं
डासान घेतला चावा
दाद म्हणून जिला
प्रत्येकाकडून शिवी आहे
कुणालाही आवडू नये
अशी कविता हवी आहे


कागद जणू वाटावा
डोक्यावर ओझे मांडले
अर्थ असा निघावा
नवरा-बायको भांडले
चित्राविणा साऊंडविणा
चालणारी मुव्ही आहे
कुणालाही आवडू नये
अशी कविता हवी आहे


प्रेमिकेच्या तोंडून निघाव
अवो माय माय माय
लिहू नकोस कविता तुला
आईची शपथ हाय
फाडल्यावरही लक्षात असावा
कोण 'हिचा' कवी आहे
कुणालाही आवडू नये
अशी कविता हवी आहे


-- विवेक
२६.०४.१६

------ जागा --------

तुम्ही बसने अर्थात आपल्या एस.टी. ने प्रवास केला असेलच..
कधी तुम्हाला आला का हो असा अनुभव??

किती उशीर झालाय
अजून आली नाही बस
स्टॉप वर उभा राहण्यात
लागतो किती कस

सगळी जण कशी
घामानेच न्हाली
कुणीतरी ओरडलं
अरे बस आली

मग सुरू होते
आयुष्याची रेस
तिथे दिसते संस्कृती
तिथे दिसतो देश

सीट मिळवण्यासाठी
कुणी टाकतो रूमाल
छोटा बाळ टाकणारे
माय बाप कमाल

तरणेताठे युवक
जागेसाठी भांडतात
छोट्याशा बसमध्ये
संसद जणू मांडतात

प्रवास होतो सुरू
संपून बाय बाय
थरथरणारा आवाज येतो
थोडं सरकता काय??

कुणी लक्षच देत नाही
कुणी टाळतो द्यायचं
न विचारता सांगतो
'इतक्या लांब जायचं'

इतक्यात कुणीतरी
स्वताहून उभा होतो
हसरी मुद्रा करुण
आपली जागा देतो

न बोलता सांगून जातो
अरे माणूसकीने वागा
उभा राहून व्यापून घेतो
मनातली थोडी जागा

- विवेक
२६.०४.१६

Thursday, 21 April 2016

------ पाणीपुरी -----



चेहरा तिचा 'तसाच' गोल
ओठांवर 'तेच' तिखट बोल
चटणीसारखी आतून ऩरम
कधी थंड कधी गरम
मी हाती घेऊन प्रेमाची प्लेट
तीचा वाढतोय दररोज 'रेट'
ती अगदीच जाम भारी
जणू काही " पाणीपुरी"
जणू काही " पाणीपुरी"


- विवेक
३०.०३.१६

Wednesday, 20 April 2016

तुझे हित

मी इकडे लिहतो, तू तिकडे वाचते
हीच बरी रीत आहे
माझ्या तोंडून कविता न ऐकण्यातच
सखी तुझे हित आहे

आता तू उचलत असणार
अर्थ आपल्या सोईचा
घाई घाईत दिसत नसणार
रंग काळजाच्या शाईचा
चाल तुझी, लय तुझी
तुझेच त्यास संगीत आहे
माझ्या तोंडून कविता न ऐकण्यातच
सखी तुझे हित आहे

उगाच ऐकून मला
तूच कोड्यात पडणार
शब्द असणार तेच
शब्दांपलीकडले कळणार
'मधुमेह' होईल तुला
बोलणं माझं 'स्वीट' आहे
माझ्या तोंडून कविता न ऐकण्यातच
सखी तुझे हित आहे

-- विवेक
२१.०४.१६

--------मित्र म्हणून कवी म्हणजे??------


एखाद्या कवीविषयी त्याच्या मित्राला कदाचित काय वाटत असाव असा विचार करूण गमतीशीर पद्धतीने ही कविता लिहलीय..कवीच्या मित्रांच्या भावनांना मी कितपत न्याय देवू शकलो??.. तुमच्यावर सोडलं..


याच्या तोंडी असतो नेहमी शब्दांचाच घास
मित्र म्हणून कवी म्हणजे त्रास असतो त्रास


हसत हसत कधीतरी जवळ येवून बसतो
"आज एक कविता लिहली".. असं सांगून डसतो
कविता वाचून दाखविण्याचा याचा विचार दिसतो
मूड बिड असो नसो ह्याला आम्ही सोसतो
विवेकी विचारांचा जणू गळ्याभोवती फास
मित्र म्हणून कवी म्हणजे त्रास असतो त्रास


फालतू काम करण्यासाठी याच्यापाशी बराच वेळ
"केस मोकळे, गाल गुलाबी" सौंदर्याशी चालू खेळ
मला सांगा पावसाविणा खरचं का हे भिजत असतील?
याच जगणं वागणं पाहून कल्पनाही लाजत असतील
प्रेमाच्या परीक्षेत होत नाही.. काठावरही पास
मित्र म्हणून कवी म्हणजे त्रास असतो त्रास


कधी होतो जख्मी वाघ, कधी होतो नाजूक फूल
कधी काऊ चिऊ संगे, भेटतो कुणी लहान मूल
खोटं बोलण सुद्धा याच अगदी अगदी खरं असतं
कल्पनेच्या नावाखाली सगळं काही बरं असतं
भाव माझे शिजत असता याला कुठून जातो वास??
मित्र म्हणून कवी म्हणजे त्रास असतो त्रास


एकटा एकटा असताना याचा कागद वाचत बसतो
प्रत्येक ओळींमध्ये मी मात्र स्वतालाच बघत असतो
विचार करतो कधी कधी कवी मला काय देतो
ओठांवर हसू कधी आसवांना न्याय देतो
असला नसला सोबत तरी, जवळीकतेचा भास
मित्र म्हणून कवी म्हणजे असतो अगदी खास


--- विवेक
14.04.16

Tuesday, 12 April 2016

---- सोप्पं सोप्पं लिही -----



मी लिहिलेलं तिला 
कळेनाच काही
 म्हणून म्हणाली काहीतरी
 सोप्पं सोप्पं लिही 

 कसल्या तुझ्या उपमा
 म्हणे कसले तुझे रूपक
 समजून घेण्या सारं 
माझी बुद्धी नाही व्यापक 
शब्द माझे करतात
 तिच्या ‘दिमागाचं दही’ 
म्हणून म्हणाली काहीतरी
 सोप्पं सोप्पं लिही

 पाऊस नको, रात्र नको 
नकोत लाटा,नकोत घन 
तिला हवेत म्हणे 
फक्त आम्ही दोघेजण 
रूतु लागलेत तिला 
 गुलाब आणि जुई 
म्हणून म्हणाली काहीतरी 
सोप्पं सोप्पं लिही 

 मी म्हटलं चला
 प्रयत्न करून बघतो 
डोक्यातून कोणता 
सोपा शब्द निघतो 
तिच्याकडे घेवून गेलो 
कोरी कोरी वही 
सोप्पी सोप्पी कविता 
कशी 'एकदम सही' 

 - शब्दप्रेमी 
    ११-०४-१६

Monday, 11 April 2016

उलटं पालटं


वारा लागलाय माझ्या भवताली फिरू
मनातले शब्द त्याला वाटे चोरू
मी माझ्या मनी शब्द आहेत माळले
हे त्या उनाडाला कुठून बरे कळले???

त्याला नक्कीच कुणीतरी सांगितले असणार
कान त्याचे कुणीतरी भरलेले असणार
मी म्हटलं बाबा तुला पाठवलयं कुणी
हुश्शार आणि गुणी?? की वेडी आहे कुणी??

नाव तिचे सांगले त्याने हळूच कानात
"अस्स म्हणजे ती का??" मी म्हटलं मनात
असतात काही लोक जास्तीच शहाणे
दुस-यांना सतावण्याचे शोधत असतात बहाणे

यांना मस्त जमते इतरांना फिरवणे
सोप्या उत्तरांचे पुन्हा कठीण प्रश्न बनवणे
मी पण मग शब्द माझे फिरवले
उलटं पालटं लिहायचं मनाशीच ठरवले


- शब्दप्रेमी 
02.04.2016

Wednesday, 6 April 2016

~~~~ उगाच नाही म्हणायचं ~~~~



प्रत्येकाचा हा अनुभव असावा असं वाटतयं... बघा पटतयं का?

मनात काय चाललयं
कसं काय जाणायचं
सगळं हवं असताना
उगाच ‘नाही’ म्हणायचं

कधी वाटे भीती
कधी वाटे लज्जा
मॅनर्स येवून आडवे
इच्छेचा होतो फज्जा
सपाट अशा रस्त्यावर
स्वत:च खड्डा खणायचं
सगळं हवं असताना
उगाच ‘नाही’ म्हणायचं

घाबरण्याची सुद्धा
कारणे असतात खास
आपल्यामुळे होईल वाटे
इतरांना त्रास
गृहीत धरूण सगळं
तर्कास खरं मानायचं
सगळं हवं असताना
उगाच ‘नाही’ म्हणायचं

- ------   विवेक

06.04.2016

Saturday, 2 April 2016

------- कमाई --------


मनाला जाणवतेय बात हलकी हलकी
आभाळावर दाखवेल कुणी त्याची मालकी
स्पर्धेच्या या युगात  स्वत:लाही गमावणे
यालाच म्हणतात वाटते काहीतरी कमावणे


हवेचे सुद्धा निघतील ब्र्यांड आगळे वेगळे
झाडांना सुद्धा हवेचे बटन लावतील सगळे
जमणार नाही कुणाला कशातच सामावणे
यालाच म्हणतात वाटते काहीतरी कमावणे


- विवेक 
01.04.2016

---------शंका--------



हरेक नवीन कामाची
       हीच एक कहाणी
काम करायचयं सुरु
       सोबत शंकांची बहाणी

जोडावा म्हणतो
            जेव्हा नवीन धागा
मनाचा एवढा गुंता
            त्यात संदेहाला जागा

नवीन काम म्हणजे
            नव्या विचारांचा डंका
सारं स्पष्ट असूनही
            कुठुन येतात शंका

स्वत:च स्वत:शी
            पटत नसते धडं
आपसूकच मिळते मग
            शंकेलाही बळं

यशासाठी काही मग
            शोधतात चोरवाटा
फुल देखील पायाला
            भासू लागतो काटा

मगं मन घेते
            पळवाटेचा शोध
हीच आहे वेळ
            घ्यायचा काही बोध

--- विवेक
30.03.2016