मी लिहिलेलं तिला
कळेनाच काही
म्हणून म्हणाली काहीतरी
सोप्पं सोप्पं लिही
कसल्या तुझ्या उपमा
म्हणे कसले तुझे रूपक
समजून घेण्या सारं
माझी बुद्धी नाही व्यापक
शब्द माझे करतात
तिच्या ‘दिमागाचं दही’
म्हणून म्हणाली काहीतरी
सोप्पं सोप्पं लिही
पाऊस नको, रात्र नको
नकोत लाटा,नकोत घन
तिला हवेत म्हणे
फक्त आम्ही दोघेजण
रूतु लागलेत तिला
गुलाब आणि जुई
म्हणून म्हणाली काहीतरी
सोप्पं सोप्पं लिही
मी म्हटलं चला
प्रयत्न करून बघतो
डोक्यातून कोणता
सोपा शब्द निघतो
तिच्याकडे घेवून गेलो
कोरी कोरी वही
सोप्पी सोप्पी कविता
कशी 'एकदम सही'
- शब्दप्रेमी
११-०४-१६
No comments:
Post a Comment