Wednesday, 20 April 2016

--------मित्र म्हणून कवी म्हणजे??------


एखाद्या कवीविषयी त्याच्या मित्राला कदाचित काय वाटत असाव असा विचार करूण गमतीशीर पद्धतीने ही कविता लिहलीय..कवीच्या मित्रांच्या भावनांना मी कितपत न्याय देवू शकलो??.. तुमच्यावर सोडलं..


याच्या तोंडी असतो नेहमी शब्दांचाच घास
मित्र म्हणून कवी म्हणजे त्रास असतो त्रास


हसत हसत कधीतरी जवळ येवून बसतो
"आज एक कविता लिहली".. असं सांगून डसतो
कविता वाचून दाखविण्याचा याचा विचार दिसतो
मूड बिड असो नसो ह्याला आम्ही सोसतो
विवेकी विचारांचा जणू गळ्याभोवती फास
मित्र म्हणून कवी म्हणजे त्रास असतो त्रास


फालतू काम करण्यासाठी याच्यापाशी बराच वेळ
"केस मोकळे, गाल गुलाबी" सौंदर्याशी चालू खेळ
मला सांगा पावसाविणा खरचं का हे भिजत असतील?
याच जगणं वागणं पाहून कल्पनाही लाजत असतील
प्रेमाच्या परीक्षेत होत नाही.. काठावरही पास
मित्र म्हणून कवी म्हणजे त्रास असतो त्रास


कधी होतो जख्मी वाघ, कधी होतो नाजूक फूल
कधी काऊ चिऊ संगे, भेटतो कुणी लहान मूल
खोटं बोलण सुद्धा याच अगदी अगदी खरं असतं
कल्पनेच्या नावाखाली सगळं काही बरं असतं
भाव माझे शिजत असता याला कुठून जातो वास??
मित्र म्हणून कवी म्हणजे त्रास असतो त्रास


एकटा एकटा असताना याचा कागद वाचत बसतो
प्रत्येक ओळींमध्ये मी मात्र स्वतालाच बघत असतो
विचार करतो कधी कधी कवी मला काय देतो
ओठांवर हसू कधी आसवांना न्याय देतो
असला नसला सोबत तरी, जवळीकतेचा भास
मित्र म्हणून कवी म्हणजे असतो अगदी खास


--- विवेक
14.04.16

No comments:

Post a Comment