Monday, 8 August 2016

माझे जगणे

तो म्हणाला
इतका वेळ
कशाला तिची वाट बघायची


तुझ्या प्रश्नाशी
तिचं उत्तर जुळत नाही
तिला काय हवयं
तिचं तिलाच कळत नाही


तुझ्याही डोक्यात येत असतील
असंख्य प्रश्न
प्रश्न प्रश्नांचा मांडत असणार
रोज जश्न


होत नाही का रे तुला
फांदीवर लटकल्याचा भास
किती काळ लटकशील
हातांना होत असेल ना त्रास


हा कोणता प्रकार आहे
दुस-याचं मनं राखण्याचा
तिच्यापुढे उभं राहून
स्वतापुढेच झुकण्याचा


मी म्हणालो
माझा नाही विश्वास
झुलणे, लटकणे बातांवरती
मला विश्वास आहे
जगण्यावरती, स्वत:वरती


तुमच्या भाषेत ह्याला
म्हणत असतील "वाट बघणे"
हे मात्र माझ्यासाठी
"मी" होवून "माझे जगणे"


-- विवेक कापगते, भंडारा
०५/०७/१६

---- गवत्या ----

तुझं यार सगळं कसं मस्त आहे
कुठलीही जागा, प्रकार, घटक, वातावरण
यांच्याशी तुझं काही घेणं देणं नाही
आणि अशी कुठलीही माती नाही
ज्यावर तुझं हिरवं लेणं नाही

तसं तर तू सगळ्यांनाच आवडतोस
तू लहान मुलांच तर लोळण्याच कापूस
तरीही तुझ्याकडे नसतं कुणाचं फारस लक्ष
किंवा ब-याच जणांना कदाचित तुझी कदर नसेल
पण ज्यांना तुझं सौंदर्य कळतं
त्यांचे मनी नक्कीच तुझी मखमली चादर असेल

जेव्हा तू वा-यासंगे डोलतोस ना
सारं विसरून... बघतच राहावसं वाटते
मला ऐकू येते तुझं लयबद्ध संगीत
डोळे मिटून... मस्त ऐकावसं वाटते

काही प्राण्यांसाठी तु तर औषध आहेस
नको असलेलं बाहेर घालवण्यासाठी
बघितलय तुझं ते रूप मी
दुर्वा बनून देवाला पुजण्यासाठी

कधीकधी होतो प्रयत्न
तुला मारण्याचा वा जाळण्याचा
पण मला आवडतो तुझा स्वभाव
ओल मिळाल्यावर पुन्हा डोकं वर काढण्याचा

'गवत्या' अरे अजून काय बोलणार तुझ्याविषयी
आय रियली फिल जेलस ऑफ यू
आम्हाला कधी होता येईल का रे अस्सल हिरवं....
अगदी तुझ्यासारखं
गवत्या सांग ना.....
-- विवेक
०२.०७.२०१६

----- हवाहवासा पाऊस ----


ढग भांडतात, चिडतात
वा-याच्या दिशेनेे पळतात
आकाशात ट्राफिक वाढते
हॉर्न वाजू लागतात
मग कुणाचातरी एक्सीडेंट होतो
आणि मोठा धमाका होतो
कुणीतरी त्यांचे
फोटो सुद्धा काढतो
आकाशाच्या घरात
इतका तांडव घडतो
म्हणूनच तर मित्रा
आपला आकाश रडतो

आणि हे गरजणे, चिडणे
आसवांचे लगडणे
यालाच कदाचित आपण
"हवाहवासा पाऊस" म्हणतो.



- विवेक
01.07.16

---- *किती शहाणे* ----

---- *किती शहाणे* ----

आनंदाने जगावयाचे
जणू बहाणे अपुले नाते
मी तर वेडा, तू ही वेडी
तरी शहाणे अपुले नाते


वेळ बदलली, काळ बदलले
स्वप्नांचे आभाळ बदलले
नवा सूर्य अन् नवा चंद्रमा
रूतु संगे झाड बदलले
नवे अनुभव घेऊन संगे
नव्या मनांचे नवीन खाते
किती शहाणे, अपुले नाते
किती शहाणे, अपुले नाते



थोडे लपते , थोडे खुपते
मी ही जपतो, तू ही जपते
समर्थ उभे ताठ मानेने
एकमेकां पुढेच झुकते
भगवंतापुढे भक्ताचे
जणू गा-हाणे अपुले नाते
किती शहाणे, अपुले नाते
किती शहाणे, अपुले नाते



खरं खोटं नाहीत भिंती
चांगल वाईट नाहीच गणती
वादळातही तेवत असते
सदैव विश्वासाची पणती
बांधून धागे मनामनाचे
मुक्तपणाने हिंडत जाते
किती शहाणे, अपुले नाते
किती शहाणे, अपुले नाते



शिल्पांवरती बुद्ध कोरणे
तसेच माझे तुझ्यात उरणे
विरोध करता खुळा बावळा
जिंकून जाते माझे हरणे
डोळे मिटले असता सुद्धा
जणू पाहणे अपुले नाते
किती शहाणे, अपुले नाते
किती शहाणे, अपुले नाते



- *विवेक*
०३.०६.१६