Thursday, 8 October 2015

लाच




शब्दांचीच देतो मी  राणी तुला लाच
एकदा तरी शांतपणे माझी कविता वाच

प्रत्येक शब्द तुला वाटेल तुझीच अदा
तू तुझीच  होशील तुझ्यावरच फिदा
विचार करत मनोमन शृंगाराने सजशील
गोड गोड हसता हसता हळूच थोडी लाजशील
ज्याला ‘आरसा’ म्हणतेस तोच हा ‘काच’
एकदा तरी शांतपणे माझी कविता वाच

तुच तुला सांगशील हे नाहीत केवळ शब्द
जवळ घेवून कवितेला त्यात होशील लुब्ध
तीच तीच ओळ वाचशील पुन्हा पुन्हा
इतकाच काय तो ठरेल कवितेचा गुन्हा
माझ्या हरेक कवितेचा  तूच करशील ‘सुतोवाच’
एकदा तरी शांतपणे माझी कविता वाच

हळू हळू मोर्चा तुझा माझ्याकडे वळेल
शब्दांतून थेट नजर माझ्याशीच  भिडेल
‘मी’ आसपास असल्याचा होईल तुला भास
मी अगदी तसाच पण वाटेन तुला खास
ज्याला मन शोधत होते  ‘तो’ म्हणशील ‘हाच’  
एकदा तरी शांतपणे माझी कविता वाच

-- विवेक 

( सुतोवाच – पूर्वसूचना  )