Wednesday, 14 March 2018

चॅटींग_करता_करता

#चॅटींग_करता_करता

एक मेसेज तुझा, एक मेसेज माझा...
मन वायब्रेट वायब्रेट होते,शब्द बनतात विजा
त्या थरथरणाऱ्या ओळी,अन स्माईली वेळो वेळी
एकटाच मी हसतो, दुनियेला मारून गोळी
मी इकडे नाक मुरडतो,अन तिला इशारा कळतो
मेसेज कधी एखादा, रिप्लाय विना तडफडतो
किती मैलांचेही अंतर, शून्यच भासून जाते
हे चॅटींग करता करता, मन मनास घासून जाते
हे चॅटींग करता करता, मन मनास घासून जाते


प्रेमाचे जाळे विणती, ओळख लपवूनी कोणी
मग एके दिवशी कळते, समलिंगी आहेत दोन्ही
कधी अशी फसवणूक होते, कधी तशी फसवणूक होते
गृपिंग वर चॅटिंग म्हणजे, किती हसवणूक होते
कुणी नकोनकोसे छळते,कुणी मागे लागून पडते
कुणी ढगाप्रमाणे बरसून मृदगंध मनी दरवळते
कधी रंग हवाहवासा कुणी जिवास फासून जाते
हे चॅटींग करता करता, मन मनास घासून जाते
…..................मन मनास घासून जाते

-- विवेक
   ०६ × ०३ × १८

अज्ञातवास

शब्द शस्त्र तुझ्यावरती ठेवले मी
तू शमीचे वृक्ष आहे ऐकले मी

ओळखीचे असूनही अनोळखीपण
हे  कसे अज्ञातवास भोगले मी

एक धागा बांधला मी विवेकाचा
स्वतःचेच वस्त्रहरण रोकले मी

त्याज्जीले कवच आणि कुंडलेही
हे खरे चक्रव्यूह भेदले मी

रम्य आहे, सत्य आहे, आभाससुद्धा
शब्दांचेच इंद्रप्रस्थ बांधले मी

-- विवेक

जरा जरा मी तिला

जरा जरा मी तिला लागलो कळायला
जरा जरा ती मला लागली टाळायला

जरा जराशी कारणे, जरा जरा नाराजगी
जरा जरा सूर अमुचे लागले जुळायला

गगनभेदी आश्वासने, पूर्तता सुनी सुनी
तेच त्यांच्या डोहात आता लागले बुडायला

विवेकाचा रंग होता,संवेदनेचा गंध होता
त्या फुलांना बादशाही लागली खुडायला


-- विवेक