Monday, 8 August 2016

---- *किती शहाणे* ----

---- *किती शहाणे* ----

आनंदाने जगावयाचे
जणू बहाणे अपुले नाते
मी तर वेडा, तू ही वेडी
तरी शहाणे अपुले नाते


वेळ बदलली, काळ बदलले
स्वप्नांचे आभाळ बदलले
नवा सूर्य अन् नवा चंद्रमा
रूतु संगे झाड बदलले
नवे अनुभव घेऊन संगे
नव्या मनांचे नवीन खाते
किती शहाणे, अपुले नाते
किती शहाणे, अपुले नाते



थोडे लपते , थोडे खुपते
मी ही जपतो, तू ही जपते
समर्थ उभे ताठ मानेने
एकमेकां पुढेच झुकते
भगवंतापुढे भक्ताचे
जणू गा-हाणे अपुले नाते
किती शहाणे, अपुले नाते
किती शहाणे, अपुले नाते



खरं खोटं नाहीत भिंती
चांगल वाईट नाहीच गणती
वादळातही तेवत असते
सदैव विश्वासाची पणती
बांधून धागे मनामनाचे
मुक्तपणाने हिंडत जाते
किती शहाणे, अपुले नाते
किती शहाणे, अपुले नाते



शिल्पांवरती बुद्ध कोरणे
तसेच माझे तुझ्यात उरणे
विरोध करता खुळा बावळा
जिंकून जाते माझे हरणे
डोळे मिटले असता सुद्धा
जणू पाहणे अपुले नाते
किती शहाणे, अपुले नाते
किती शहाणे, अपुले नाते



- *विवेक*
०३.०६.१६

No comments:

Post a Comment