Tuesday, 7 February 2017

मला नाही करायचयं तिच्याशी लग्न

मला नाही पटतं तिचं पुस्तकी वागणं
मला नाही करायचयं तिच्याशी लग्न

फिरायला जायचं ठरलं घेवून टु व्हीलर
लायसन्स घेतलं खिशात वाटलं ऑल क्लिअर
तिचं मात्र वेगळचं, म्हणे हेल्मेट घालायचं
नियम नाही मोडायचं, सिग्नल सारे पाळायचं
प्रवास सुरु होण्यापुर्वीच, हिचं नागरिकशास्त्र विघ्नं   
मला नाही करायचयं तिच्याशी लग्न

मी म्हटलं फिरायला किल्ल्यावरती जावू
गोड गोड गप्पा करू, तिखटं काही खावू
किल्ल्यावरती तिला मात्र दिसली हिरकणी
कधी आठवे अमुक राजा कधी तमुक राणी
मी असताना देखील इतिहासात बघणं
मला नाही करायचयं तिच्याशी लग्न

नंतर आम्ही दोघे बागेत जावून बसलो
रोमॅटिक वातावरण बघून स्वत:शीच हसलो
तिला मात्र दिसत होता आसपासचा कचरा
प्लासटिक आणि कागद यांचा कधी होणार निचरा
मी बघतोय तिच्याकडे, तिचं पर्यावरण बघणं
मला नाही करायचयं तिच्याशी लग्न

संध्याकाळी घालवला थोडा समुद्रावर वेळ
मला वाटलं खावं, पाणीपुरी व भेळ
ती म्हटली हे हायजेनिक नसते
अस्वछपणा असतोच त्यात विटॅमिनही नसते
तीचं सुरु विज्ञान अन मी खाण्यात मग्न
मला नाही करायचयं तिच्याशी लग्न

परतीला तीच म्हटली बोअर झाला असशील
छोटासा का होईना बुक स्टोअर झाला असशील
माझं असचं असतं, असणं तसं दिसणं
समोरच्याला थोडा त्रास आणि थोडं हसणं
हळूहळू पटतं होतं मला तिचं जगणं
करू का रे मित्रा तिच्याशीश  लग्न????


--- विवेक कापगते
    01.02.2017

No comments:

Post a Comment