Wednesday, 14 December 2016

#...साक्षरता व प्रगती...#


ज्याचे मनात वाढत गेली,
आई-बाबा शब्दांची खोली
तो म्हणावा साक्षर झाला
अन् घराची प्रगती झाली


तो कदाचित नसेल शिकला
परि ज्याने ना आत्मा विकला
नितळ तेज बघ चैतन्याचे
सदैव फुलते ज्याचे गाली
तो म्हणावा साक्षर झाला
अन् घराची प्रगती झाली


जगण्यासाठी जरी संघर्ष
दुःखाचाही कातर स्पर्श
दोष न देता इतरांवरती
जो स्वत:चा स्वत:च वाली
तो म्हणावा साक्षर झाला
अन् घराची प्रगती झाली


अन्यायाचा कचरा पुरतो
सत्वृक्षाचे रोपण करतो
आदर आणिक प्रेमाच्या
मनात ज्याचे हिरव्या शाली
तो म्हणावा साक्षर झाला
अन् घराची प्रगती झाली


- विवेक कापगते
    सोळा/दहा/सोळा

No comments:

Post a Comment