Tuesday, 27 December 2016

--- *पुरुषार्थ* ---


ए तू उच्चशिक्षित आहेस म्हणे
नुकतचं ठरलयं म्हणे तुझं लग्न
 लग्नाचं सेलिब्रेशन कसं करायचं
 हे ठरविण्यात असतोस म्हणे मग्न

तूच सांगतोस,
तुझा विश्वास आहे प्रेमावर
आणि तुला जोडायचं नातं मनाशी
 मगं... अचानक कसं रे
तुला देणघेण आलं तिच्या धनाशी

तुला महागडा सूट हवा
पायामध्ये नवा बूट हवा
सासरकडून "मानसन्मान"
अगदी अगदी नीट हवा

तू घेणार आहेस म्हणे हुंडा
केवळ घरचे म्हणतात म्हणून
किंवा जातीतील रीत म्हणून
इतरांनाच सांगायच पुरोगामित्व
 स्वतःला हलकेच वगळून

जे चित्र बघून संतापायचास
त्याचीच करतोस तू नक्कल
फालतू गोष्टी तुला पटताहेत
गहाण ठेवलीस वाटते अक्कल

कृतीत येत नसतील तर
कागदी विचारांना काय अर्थ
स्वतापुरती वाट बदलायची
यात कसला आला पुरूषार्थ??

अन् म्हणे तू उच्चशिक्षित??

-- विवेक कापगते

No comments:

Post a Comment