Tuesday, 17 October 2017

खरं सांगू....

तुझ्या आठवणींत दडली आहे
अजून तरी तीच गोडी
खरं सांगू.... तुझी आठवण
तुझ्याप्रमाणेच आहे वेडी

तुझी आठवणं जणू वेल
त्यावर फुलांची रेलचेल
मी तिथेच चिवचिव करत
घालत असतो घालमेल
देवून जाते ओंजळ भरून
नवा सुगंध प्रत्येक वेळी
खरं सांगू.... तुझी आठवण
तुझ्याप्रमाणेच आहे वेडी

इंद्रधनुच्या रंगाप्रमाणे
तुझी आठवण रंगीत आहे
पावसाच्या सरींप्रमाणे
त्यात सुरेल संगीत आहे
आयुष्याच्या उन्हामध्ये
सावली जणू थोडी थोडी
खरं सांगू.... तुझी आठवण
तुझ्याप्रमाणेच आहे वेडी

आठवणींच्या स्वभावाचं
गुपित मला कळलं आहे
वरवर जरी अल्लडपणा
आत शहाणपण दडलं आहे
सचिनच्या शतकाची
जणू सदाबहार खेळी
खरं सांगू.... तुझी आठवण
तुझ्याप्रमाणेच आहे वेडी


-- विवेक
   ०४ सप्टें १७

No comments:

Post a Comment