Tuesday, 17 October 2017

शाही व्यसन

चढू दे नशा, थोडं वेड्यागत वागू दे
देवा मला स्वच्छतेचं शाही व्यसन लागू दे

पूर येतोय कचऱ्याचा
बांधा संकल्पाच धरण
स्वच्छतेकडे पाहिलं पाऊल
कचऱ्याच वर्गीकरण
ओला कचरा  सुका कचरा घरीच विभागू दे
देवा मला स्वच्छतेचं शाही व्यसन लागू दे

धार्मिक, सार्वजनिक वा
असो घरगुती समारंभ
प्लास्टिक ग्लास,द्रोण, पत्रावळ
यांचाच असतो दंभ
युज अँड थ्रो, आता मला टाळू दे
देवा मला स्वच्छतेचं शाही व्यसन लागू दे

गाडीवरून उतरायचं नाही
असाही काहींचा ठराव असतो
रस्त्यावरून कुंडीत कचरा टाकणे
नेमाबाजीचा सराव असतो
आसपास नव्हे तर कुंडीत कचरा जाऊ दे
देवा मला स्वच्छतेचं शाही व्यसन लागू दे

माझं घर , माझा अंगण
स्वच्छता बेफाम आहे
बाकीचं घेणं देणं नाही
ते शासकीय काम आहे
निसर्गाशी शासनाशी माझंही नातं जुळू दे
देवा मला स्वच्छतेचं शाही व्यसन लागू दे

एके दिवशी ओला कचरा
मीच घरी कुजवेन
खत तयार करून
माझी बाग सजवेन
जागृतीचा नवा सूर्य माझ्या अंगणी उगू दे
देवा मला स्वच्छतेचं शाही व्यसन लागू दे

उच्च लोकांचे विचार
अगदीच कसे तुच्छ
जो उचलतो कचरा
तो कसा अस्वच्छ ??
त्या मनाची आग, या मनाला लागू दे
देवा मला स्वच्छतेचं शाही व्यसन लागू दे

-- विवेक कापगते
    भंडारा



No comments:

Post a Comment